गौतम गंभीर बाबत बीसीसीआयचा 'हा' मोठा निर्णय

गौतम गंभीर बाबत बीसीसीआयचा 'हा' मोठा निर्णय

क्रिकेट विश्व - दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या लाजिरवाण्या कसोटी मालिकेतील पराभवानंतर बीसीसीआयने तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीत गौतम गंभीर यांना प्रशिक्षकपदावर कायम ठेवायचे की नाही, याबाबत निर्णय घेतला जाणार होता. अखेर बीसीसीआयने गंभीर यांच्याबाबतचा निर्णय स्पष्ट केला आहे.

रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना संघाबाहेर ठेवण्यात आल्यापासूनच चाहत्यांचा गंभीर यांच्याविरोधात रोष वाढला होता. दुसऱ्या सामन्यातील दणदणीत पराभवानंतर तर प्रेक्षकांनी मैदानातच "गौतम गंभीर हाय हाय" अशा घोषणा दिल्या होत्या. त्यामुळे गंभीर यांना कसोटी प्रशिक्षकपदावरून दूर केले जाईल, अशा चर्चा तापल्या होत्या. याच कारणास्तव ही बैठक बोलावण्यात आल्याची माहिती समोर आली होती.

गंभीर यांच्या मार्गदर्शनाखाली भारताने सलग तिसरी कसोटी मालिका गमावली आहे. देशातच असा मोठा पराभव भारताने यापूर्वी पाहिला नव्हता. त्यामुळे कसोटी संघाबाबत चिंता वाढली होती. गंभीर यांना टी२० आणि वनडे संघांचे प्रशिक्षकपद देऊन कसोटी संघासाठी वेगळा प्रशिक्षक नेमावा, अशीही चर्चा होती. मात्र आता बीसीसीआयने यावर अंतिम भूमिका स्पष्ट केली आहे.

बीसीसीआयमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बैठकीत गंभीर यांच्याबाबत सविस्तर चर्चा झाली आणि त्यांच्या कार्यशैलीवर विश्वास कायम ठेवण्यात आला. त्यामुळे गौतम गंभीर हे पुढेही भारताच्या तिन्ही संघांचे कसोटी, वनडे आणि टी २० प्रशिक्षक म्हणून कार्यरत राहतील. अशाप्रकारे, बीसीसीआयने गंभीर यांना प्रशिक्षकपदावरून काढण्याचा कोणताही विचार केलेला नसून त्यांच्या पदावरील टांगती तलवार किमान सध्या तरी दूर झाली आहे.