भारत - दक्षिण आफ्रिका वनडे मालिकेच्या अगोदर रोहित शर्माला मोठा धक्का..!
क्रिकेट न्यूज : भारत - दक्षिण आफ्रिका वनडे मालिकेच्या अगोदर टीम इंडियासाठी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. सलग तीन आठवडे आयसीसी एकदिवसीय रँकिंगमध्ये अव्वल राहिल्यानंतर हिटमॅन रोहित शर्मा एका स्थानाने खाली घसरला असून तो आता दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. न्यूझीलंडचा तडाखेबाज फलंदाज डेरिल मिचेल 782 गुणांसह पहिल्या स्थानावर विराजमान झाला आहे, तर रोहितकडे 781 गुण आहेत.

वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्या वनडेत मिचेलने 118 चेंडूत 119 धावांची खेळी करत आपल्या कारकिर्दीतील सातवे शतक झळकावले. 12 चौकार आणि 2 षटकारांनी सजलेल्या या इनिंगमुळे न्यूझीलंडला 7 धावांनी विजय मिळवून देत त्याने रँकिंगमध्ये मोठी झेप घेतली. विशेष म्हणजे, मिचेल हा वनडे रँकिंगमध्ये अव्वल स्थान मिळवणारा न्यूझीलंडचा फक्त दुसरा फलंदाज ठरला आहे. 1979 नंतर ग्लेन टर्नरनंतर तो हा मान मिळवणारा पहिला खेळाडू आहे.
रोहित आणि मिचेल यांच्यात फक्त 1 गुणाचा फरक असल्याने आगामी दक्षिण आफ्रिका मालिकेत रोहित दमदार कामगिरी करताच पुन्हा नंबर वनची गादी मिळवू शकतो. टॉप -10 यादीत भारतीय वर्चस्व कायम असून रोहितव्यतिरिक्त शुभमन गिल चौथ्या, विराट कोहली पाचव्या आणि श्रेयस अय्यर आठव्या स्थानावर आहेत. चार भारतीय फलंदाजांचे टॉप - 10 मध्ये स्थान टीम इंडियाची भक्कम उपस्थिती दर्शवते.
गोलंदाजांमध्येही भारतीय खेळाडूंचे वर्चस्व दिसते. टी - 20 मध्ये वरुण चक्रवर्तीची कामगिरी प्रभावी ठरली आहे, तर कसोटी रँकिंगमध्ये जसप्रीत बुमराह अव्वल आहेत. एकदिवसीय गोलंदाजांत अफगाणिस्तानचा रशीद खान पहिल्या स्थानावर आहे.
श्रीलंका - पाकिस्तान मालिकेनंतर पाकिस्तानी खेळाडूंची रँकिंगही सुधारली आहे. मोहम्मद रिजवान पाच स्थानांनी वर चढत 22 व्या स्थानी पोहोचला, तर फखर जमान 26 व्या स्थानावर स्थिरावला आहे.




