खडकेवाडा येथे भीषण अपघात; पादचाऱ्यासह तिघांचा मृत्यू, एक महिला जखमी
सेनापती कापशी प्रतिनिधी - कागल तालुक्यातील खडकेवाडा येथे निपाणी–मुरगुड मार्गावर झालेल्या भीषण चारचाकी अपघातात एकूण तिघांचा मृत्यू झाला असून एक महिला जखमी झाली आहे. यापैकी एकाचा घटनास्थळी तर दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, खडकेवाडा येथील बाळू ताशीलदार हे मोहरमचा कार्यक्रम आटोपल्यानंतर रात्री उशिरा पत्नीसमवेत गलगले फाटा परिसरातील आपल्या जनावरांच्या गोठ्याकडे पायी जात होते. त्यावेळी पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या चारचाकी वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत बाळू ताशीलदार यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांच्या पत्नी जखमी झाल्या आहेत.

अपघातानंतर वाहनचालकाचा ताबा सुटल्याने चारचाकी रस्त्यालगतच्या उंच भागावरून सुमारे २०० फूट खोल नदीकाठच्या झाडाझुडपांमध्ये कोसळली. वाहनातील प्रवाशांना गंभीर दुखापत झाली. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला, तर दुसऱ्याचा उपचार सुरू असताना प्राण गमावले.मृत झालेल्या दोन्ही प्रवाशांचे वास्तव्य निपाणी परिसरातील असल्याचे समजते. मात्र, त्यांची ओळख अद्याप स्पष्ट झालेली नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिस व स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.




