राजारामपुरीतील ड्रेनेज लाईनसाठी विशेष पॅकेज देण्याची प्रतिज्ञा उत्तुरेंनी केली महापालिका प्रशासकांकडे मागणी
कोल्हापूर (प्रतिनिधी) - कोल्हापूर शहरातील सर्वाधिक व्यापारी क्षेत्र म्हणून ओळख असलेल्या राजारामपुरीतील ड्रेनेज लाईन सुमारे ६० वर्षांपूर्वीची असून ती अत्यंत जुनी आणि असमर्थ ठरली आहे. या भागातून महापालिकेला दरवर्षी १० कोटींहून अधिक कर मिळत असतानाही आवश्यक सुविधा पुरविल्या जात नाहीत. त्यामुळे या परिसरासाठी महापालिकेने विशेष पॅकेज जाहीर करून २४ ते ३० इंची नवीन ड्रेनेज लाईन टाकावी, अशी मागणी शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख प्रतिज्ञा महेश उत्तुरे यांनी केली आहे.

महापालिका प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांना दिलेल्या निवेदनात त्यांनी सांगितले की, पूर्वी बंगले असलेल्या जागांवर आता ३० ते ५० फ्लॅट्स असलेली अपार्टमेंट्स उभारली गेली आहेत. मोठ्या प्रमाणावर शोरूम्स आणि दुकाने स्थापन झाली असून लोकवस्ती व वापर वाढलेला आहे. तरीही १९६७ मध्ये टाकलेली चार इंची ड्रेनेज लाईन अजूनही तशीच आहे. परिणामी सांडपाणी रस्त्यावरून वाहण्याच्या समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत.
राज्य शासनाच्या निधीतून महापालिका विविध भागात नवीन ड्रेनेज लाईन्स टाकत आहे. त्याअंतर्गत सम्राटनगर, प्रतिभानगर, विद्यापीठ परिसरात मोठ्या ड्रेनेज लाईन बसविल्या जात आहेत. मात्र त्या लाईन्स राजारामपुरीतील जुनी, केवळ ९ इंची ड्रेनेज लाईनला जोडण्यात येणार आहेत. १० इंची लाईन जर ४ इंची जुनी लाईनला जोडली गेली, तर त्याचा संपूर्ण भार राजारामपुरीवर येणार असून यामुळे परिस्थिती अजूनच बिकट होणार आहे, असा इशारा त्यांनी दिला.
त्यामुळे महापालिकेने नवीन बांधकामांना परवानगी देताना ड्रेनेज फंडासाठी स्वतंत्र तरतूद करावी. तसेच विशेष निधी उपलब्ध नसल्यास जिल्हा नियोजन समितीमार्फत निधी मिळवून राजारामपुरीसाठी स्वतंत्र आणि सक्षम ड्रेनेज लाईन टाकण्याची कार्यवाही करावी, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.




