छत्रपतींचा इतिहास उजळवणारा संशोधक हरपला; डॉ. जयसिंगराव पवार यांचे निधन
कोल्हापूर (प्रतिनिधी) : महाराष्ट्राच्या इतिहास संशोधन क्षेत्रातील दिग्गज आणि मराठेशाहीच्या अभ्यासाचे प्रमुख विद्वान डॉक्टर जयसिंगराव पवार यांचे आज पहाटे दुखद निधन झाले. वयाच्या 85 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.गेल्या काही दिवसांपासून प्रकृती बिघडल्याने ते कोल्हापुरातील एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत होते. त्यांच्या निधनाने इतिहास प्रेमी आणि संशोधकांच्या मनात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. डॉक्टर जयसिंगराव पवार यांचा जन्म 30 डिसेंबर 1941 रोजी सांगली जिल्ह्यातील तडसर गावात झाला. त्यांनी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथून एम ए पदवी प्रथम श्रेणित मिळवली आणि त्यानंतर पीएचडी संपादन केले.
तीन दशकांहून अधिक काळ महाविद्यालयीन स्तरावर प्राध्यापक म्हणून त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. एम एस स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी त्यांनी २० पेक्षा अधिक अभ्यासक्रम पुस्तके लिहिली. 1964 मध्ये शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू डॉ. आप्पासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या संशोधनाची सुरुवात झाली. विद्यापीठाच्या इतिहास विभागात ऐतिहासिक कागदपत्रांच्या अभ्यासातून त्यांनी आपली संशोधन कारकीर्द घडवली.त्यांच्या लेखन आणि संशोधनाने मराठा इतिहासाला नवी दिशा मिळाली. शिवाय महाराष्ट्राच्या इतिहासावर राजर्षी शाहू यांच्या चरित्रावर आणि कोल्हापूरच्या पंचखंडात्मक इतिहासावर त्यांनी संपादन कार्य केले.
निरनिराळ्या इतिहास परिषदांमध्ये आणि संशोधन नियतकालिकात त्यांचे 45 हून अधिक शोधनिबंध प्रसिद्ध झाले. ते अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेचे संस्थापक सदस्य होते आणि तीन वर्ष अध्यक्ष पद भूषविले 1992 मध्ये त्यांनी महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनी ही संस्था स्थापन केली आणि संस्थापक संचालक म्हणून दीर्घकाळ कार्य केले. इतिहास संशोधनातील योगदानाबद्दल राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते शाहू चरित्र (इंग्रजी) या ग्रंथाचे प्रकाशन झाले आणि पुण्यात त्यांना शाहू चरित्रकार म्हणून गौरवण्यात आले. त्यांच्या 25 हुन अधिक ग्रंथांना विविध संस्थांकडून सर्वोत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार मिळाले आहेत. इतिहास संशोधक आणि सामाजिक प्रमोधनासाठी अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले.




