पंजाब काँग्रेसमध्ये मोठा भूकंप? खासदार सुखजिंदर सिंह रंधावा अमित शहांच्या भेटीला ; माजी मुख्यमंत्री चन्नी नाराज
नवी दिल्ली: पंजाब काँग्रेसमध्ये नुकत्याच झालेल्या संघटनात्मक फेरबदलानंतर पक्षात अंतर्गत नाराजी आणि बंडखोरी उफाळून आली आहे. काही दिवसांपूर्वीच आम आदमी पार्टी आणि टीएमसीच्या खासदारांनी भाजपला पाठिंबा दिल्यानंतर, आता पंजाबमधील काँग्रेसचे काही बडे खासदार आणि नेते भाजपच्या वाटेवर असल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. याच दरम्यान, काँग्रेसच्या कोअर कमिटीचे नवनियुक्त अध्यक्ष, माजी उपमुख्यमंत्री आणि विद्यमान खासदार सुखजिंदर सिंह रंधावा यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

अमरिंदर सिंह राजा वडिंग यांच्या नियुक्तीने चन्नी नाराज:
पंजाब काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी अमरिंदर सिंह राजा वडिंग यांना कायम ठेवण्यात आल्याने माजी मुख्यमंत्री चरणजित सिंह चन्नी अत्यंत नाराज झाले आहेत. आपली नाराजी उघड करत चन्नी यांनी त्यांच्या निवासस्थानी समर्थकांची एक महत्त्वाची बैठक बोलावली होती. सुमारे चार तास चाललेल्या या बैठकीला ६० हून अधिक बडे नेते उपस्थित होते. यामध्ये नुकत्याच स्थापन करण्यात आलेल्या निवडणूक समित्यांतील सदस्य, २० हून अधिक विद्यमान आणि माजी आमदार, माजी मंत्री तृप्त राजिंदर बाजवा, सुखबिंदर सरकारिया, ओ. पी. सोनी, भरत भूषण आशू तसेच दिवंगत गायक सिद्धू मूसेवाला यांचे वडील बलकौर सिंह हे देखील सहभागी झाले होते. या बैठकीमुळे आगामी पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये उभी फूट पडणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
अमित शहांच्या भेटीवर रंधावा यांचे स्पष्टीकरण:
एकीकडे चन्नी गट बंडाच्या पवित्र्यात असताना, दुसरीकडे खासदार सुखजिंदर सिंह रंधावा यांनी थेट गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. रंधावा यांनी या भेटीला राजकीय रंग देण्याचे टाळले असून, ही भेट पूर्वनियोजित आणि औपचारिक होती, असा दावा केला आहे. मात्र, पंजाबमधील सध्याची अस्थिर राजकीय परिस्थिती पाहता या भेटीला अत्यंत महत्त्व दिले जात आहे.
चन्नी यांच्या बैठकीवर भाष्य करताना रंधावा म्हणाले की, "विस्तृत चर्चेनंतरही अशी परिस्थिती निर्माण होणे दुर्दैवी आहे. ही बाब गंभीर नसली, तरी अंतर्गत नाराजी का वाढली याचा विचार पक्षश्रेष्ठींनी करणे गरजेचे आहे. काँग्रेस निरीक्षक अजय माकन यांनी नेमका काय अहवाल दिला होता, याचे उत्तर तेच देऊ शकतील." मात्र, या घडामोडींमुळे पंजाब काँग्रेसमधील अंतर्गत कलह आता चव्हाट्यावर आला आहे.




