5 दिवसांत मोठे राजकीय उलटफेर? दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याचा रवी राणांचा दावा
मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींची चर्चा सुरू झाली आहे. आमदार रवी राणा यांनी केलेल्या एका दाव्यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.रवी राणा यांनी दावा केला आहे की, येत्या 15 दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट पुन्हा एकत्र येऊ शकतात. शरद पवार आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.

इतकंच नाही, तर सुप्रिया सुळे यांना केंद्रात मंत्रीपद मिळू शकते, तर सुनेत्रा पवार महाराष्ट्रातील राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावतील, असा दावाही रवी राणा यांनी केला आहे. मात्र, या दाव्यांवर अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही.रवी राणा यांनी शिवसेनेच्या दोन्ही गटांबाबतही मोठं वक्तव्य केलं आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे पुन्हा एकत्र येण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. राजकारणात कोणतीही गोष्ट अशक्य नसते, असे सांगत त्यांनी भविष्यात मोठे राजकीय समीकरण बदलू शकते, असा दावा केला.
उद्धव ठाकरे यांच्या धार्मिक कार्यक्रमांमधील सहभागावर भाष्य करताना रवी राणा यांनी म्हटले की, ठाकरे आता हिंदुत्वाच्या मुद्द्यावर पुन्हा सक्रिय होत आहेत. त्यामुळे भविष्यात शिवसेनेतील दोन्ही गट जवळ येऊ शकतात, असे त्यांनी सांगितले.दरम्यान, बारामती दौऱ्यावर असताना शरद पवार आणि प्रतिभा पवार यांनी सुपे येथील विद्या प्रतिष्ठानच्या शाळेला भेट दिली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत शाळेतील विविध उपक्रमांची माहिती घेतली.
विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासासाठी राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांचे शरद पवार यांनी कौतुक केले. बदलत्या काळातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये विचारक्षमता, सर्जनशीलता आणि आत्मविश्वास वाढवणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.आता रवी राणा यांनी केलेले हे दावे प्रत्यक्षात कितपत खरे ठरतात, महाराष्ट्राच्या राजकारणात कोणती नवी समीकरणे तयार होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




