एनडीएसोबत जाण्याचा प्रश्नच नाही; लढण्यासाठी आम्ही सज्ज आहोत – रोहित पवार
मुंबई (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी शरद पवार एनडीएसोबत जाणार असल्याच्या चर्चांना स्पष्ट शब्दांत पूर्णविराम दिला आहे. मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट ही केवळ विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी घेतली होती, त्याचा राजकीय समीकरणांशी कोणताही संबंध नाही.

रोहित पवार म्हणाले, "शरद पवार एनडीएसोबत जाणार नाहीत. आमच्या पक्षातील बहुतांश आमदार आणि खासदार लढाईसाठी तयार आहेत. मीही लोकांच्या आणि पक्षाच्या विचारांसोबत ठामपणे उभा राहणार असून, एनडीएमध्ये जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही."
याचवेळी त्यांनी सीईटी परीक्षेतील कथित गैरप्रकारांवरही सरकारवर टीका केली. राज्यात भाजप सरकार आल्यानंतर विविध भरती आणि परीक्षांचे पेपर फुटल्याच्या घटना वाढल्याचा आरोप त्यांनी केला. सीईटीबाबत विद्यार्थ्यांकडून तक्रारी आणि काही पुरावे मिळाल्याचे सांगत, हे पुरावे गृहखात्याकडे सादर केल्याची माहितीही त्यांनी दिली.तसेच, सर्व पुरावे गोळा झाल्यानंतरच याप्रकरणी सविस्तर भूमिका मांडणार असल्याचे रोहित पवार यांनी स्पष्ट केले.




