"डायल 112 वर आला हत्येचा फोन, पोलिसांची धावपळ; घटनास्थळी पोहोचताच समोर आलं धक्कादायक सत्य"
मुंबई (प्रतिनिधी) : आपत्कालीन मदतीसाठी सुरू करण्यात आलेल्या 'डायल 112' हेल्पलाइनचा गैरवापर केल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये समोर आला आहे. सातपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या दोन महिन्यांत दोन वेळा फेक कॉल करून पोलिसांची दिशाभूल करण्यात आली.सातपूर परिसरात एका व्यक्तीची हत्या झाली असून 5 ते 7 जण गंभीर जखमी असल्याचा फोन नियंत्रण कक्षाला आला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सातपूर पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी रवाना झाले.

मात्र, घटनास्थळी पोहोचल्यानंतर पोलिसांना अशी कोणतीही घटना घडली नसल्याचं आढळून आलं. हा कॉल खोडसाळपणातून करण्यात आल्याचं स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी फोन करणाऱ्याचा शोध सुरू केला. तपासात एका परप्रांतीय व्यक्तीचा शोध लागला असून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
यानंतर 2 ऑगस्ट रोजी पुन्हा एकदा सातपूर नियंत्रण कक्षाला डायल 112 वर फोन आला. यावेळी हाणामारीतून एका व्यक्तीची हत्या झाल्याची माहिती देण्यात आली. पोलीस पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली, मात्र पुन्हा एकदा अशी कोणतीही घटना घडली नसल्याचं समोर आलं.सलग दोन वेळा फेक कॉल आल्याने सातपूर पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचा शोध सुरू आहे.
दरम्यान, या फेक कॉलमागे एका महिला पोलीस कर्मचाऱ्याशी संबंधित व्यक्तीचा हात असल्याची चर्चा परिसरात सुरू होती. मात्र, सातपूर पोलिसांनी हे वृत्त फेटाळून लावलं आहे.सातपूर नियंत्रण कक्षात किंवा बीट मार्शल पथकात कोणतीही महिला पोलीस कर्मचारी कार्यरत नाही. हा प्रकार केवळ खोडसाळपणातून करण्यात आला असून, आपत्कालीन यंत्रणेची दिशाभूल केल्याप्रकरणी कारवाई सुरू आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरे यांनी दिली आहे.




