माझ्यावर हल्ला करण्याचा डाव, हिंमत असेल तर अटक करा'; सोलापुरातून मनोज जरांगेंचे गृहमंत्री फडणवीसांना थेट आव्हान!
सोलापूर: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील वातावरण पुन्हा एकदा पेटले आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्याच्या गुरुवारी सोलापूर येथून राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. "माझ्यावर हल्ला करण्याचा किंवा मला अटक करण्याचा सरकारचा शेवटचा डाव होता," असा खळबळजनक दावा करत जरांगे यांनी फडणवीसांना थेट आव्हान दिले आहे.

'गुप्त पत्र देऊन कुणबी प्रमाणपत्रे रद्द करण्याचा डाव'
प्रसारमाध्यमांशी बोलताना जरांगे म्हणाले की, "महसूल मंत्री बावनकुळे यांनी एक गुप्त पत्र देऊन मराठ्यांच्या कुणबी नोंदी आणि प्रमाणपत्रे रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. ते पत्र माझ्या हाती लागले आहे. शिंदे समितीने आणि अधिकाऱ्यांनी मूळ नोंदी शोधून काढलेल्या असताना त्या रद्द करण्याचे कारस्थान केवळ फडणवीस यांच्या सांगण्यावरून सुरू आहे. मराठ्यांच्या लेकरांचे वाटोळे करण्याचा हा डाव मी यशस्वी होऊ देणार नाही."
'२९ ऑगस्टला एकही मराठा घरी बसणार नाही'
शासकीय भूमिकेचा निषेध नोंदवत जरांगे यांनी मराठा समाजाला महाआवाहन केले आहे. "राजकारण्यांच्या डोक्यात सत्तेची हवा गेली आहे. पण २९ ऑगस्ट रोजी मराठा समाज आपली खरी ताकद दाखवून देईल. या दिवशी सर्व मराठा बांधवांनी आपल्या गाड्या घेऊन अंतरवाली सराटीच्या दिशेने निघावे. एकही मराठा घरी बसता कामा नये. हक्काचे आरक्षण मिळवल्याशिवाय आपण शांत बसणार नाही," असे जरांगे यांनी स्पष्ट केले.
'अटक करून दाखवाच, मराठे काय आहेत ते समजेल'
आपल्या सुरक्षेबाबत बोलताना जरांगे यांनी दावा केला की, "काल रात्री मला खात्रीलायक माहिती मिळाली की, पोलिसांचा बंदोबस्त बाजूला काढून माझ्यावर हल्ला करण्याचा किंवा मला अटक करण्याचा प्रयत्न होता. पण आम्हाला कोणाचीही भीती नाही. तुम्हाला अटक करायची असेल तर करून दाखवा, मराठे काय आहेत हे तुम्हाला समजेल."
'संजय शिरसाट आणि नेत्यांचे शेकडो मिसकॉल'
सत्ताधारी नेत्यांच्या संपर्काबाबत विचारले असता जरांगे म्हणाले, "संजय शिरसाट यांच्यासह अनेक नेत्यांचे मला शेकडो मिसकॉल आले आहेत. ते आपली चूक सुधारण्याची भाषा करत आहेत. माझी एकच अट आहे, आमची रद्द केलेली प्रमाणपत्रे पूर्ववत द्या, तरच सर्व सुरळीत होईल. अन्यथा यावेळी मराठा समाज तुम्हाला सत्तेवरून पाडल्याशिवाय राहणार नाही."




