मविआच्या बैठकीला 16 आमदार गैरहजर; अनुपस्थितीमागील कारणांमुळे राजकीय चर्चांना उधाण
मुंबई (प्रतिनिधी) : राज्याच्या राजकारणात सध्या घडामोडींना वेग आला असतानाच महाविकास आघाडीच्या बैठकीतील एका घटनेची जोरदार चर्चा रंगली आहे. पावसाळी अधिवेशनादरम्यान मुंबईत झालेल्या मविआच्या बैठकीला काँग्रेस, उद्धवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) या तीनही पक्षांतील मिळून तब्बल 16 आमदार अनुपस्थित राहिले.

या अनुपस्थित आमदारांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे वरिष्ठ नेते जयंत पाटील यांचाही समावेश होता. काँग्रेसचे सहा, उद्धवसेनेचे पाच आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे पाच आमदार बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत.अनुपस्थितीबाबत विविध आमदारांनी वेगवेगळी कारणे दिली आहेत. जयंत पाटील यांनी पूर्वनियोजित कौटुंबिक कार्यक्रमांमुळे बैठकीला उपस्थित राहता आले नसल्याचे स्पष्ट केले. तर इतर अनेक आमदारांनी वैयक्तिक कारणांमुळे गैरहजर राहिल्याचे सांगितले.
दरम्यान, या गैरहजेरीमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू झाल्या असल्या तरी संबंधित पक्षांच्या नेत्यांनी कोणत्याही प्रकारच्या फुटीच्या शक्यता फेटाळून लावल्या आहेत. काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे यांनी, "बैठकीला अनुपस्थित राहणे म्हणजे पक्ष सोडणे असा अर्थ होत नाही," असे स्पष्ट केले. तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कडूनही "आमचा एकही आमदार फुटणार नाही," असा ठाम दावा करण्यात आला आहे.




