देशात लगेच लोकसभा निवडणूक झाली तर भाजपला धक्का? काँग्रेसला मोठ्या यशाचा अंदाज; सर्व्हे ट्विट करत संजय राऊत म्हणाले

देशात लगेच लोकसभा निवडणूक झाली तर भाजपला धक्का? काँग्रेसला मोठ्या यशाचा अंदाज; सर्व्हे ट्विट करत संजय राऊत म्हणाले

मुंबई (प्रतिनिधी) : देशात आताच्या घडीला लोकसभेची निवडणूक झाली, तर भाजपप्रणित एनडीएला मोठा फटका बसण्याची शक्यता ‘पोल ट्रॅकर’ या संस्थेच्या सर्वेक्षणातून व्यक्त करण्यात आली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या सर्वेक्षणाचे निकाल सांगणारा एक व्हिडीओ ट्विट करत भाजपला डिवचले आहे.“आता खऱ्या अर्थाने ‘अच्छे दिन’ येणार, जुने चांगले दिवस परत येणार, मोदी-शाह जाणार, ते नक्की जाणार,” असं ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे. या ट्विटसोबत त्यांनी ‘पोल ट्रॅकर’च्या सर्वेक्षणाचे विश्लेषण करणारा व्हिडीओही शेअर केला आहे.

‘पोल ट्रॅकर’ने ‘मूड ऑफ इंडिया’ या नावाने हे सर्वेक्षण केलं होतं. या सर्वेक्षणाची सॅम्पल साईझ 4 लाख 53 हजार इतकी असल्याचं सांगण्यात आलं आहे.या सर्वेक्षणानुसार, सध्याच्या घडीला लोकसभा निवडणूक झाली तर भाजपप्रणित एनडीए आघाडीला राम मंदिरातील कथित घोटाळा आणि जंतर-मंतरवरील विद्यार्थी आंदोलनाचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामुळे आतापर्यंत सलग 12 वर्षे सत्तेत असूनही भाजपला अँटी-इन्कम्बन्सी फॅक्टरचा मोठा फटका बसलेला नव्हता. मात्र, राम मंदिर आणि जंतर-मंतरवरील आंदोलनामुळे मोदींचा करिष्मा काहीसा फिका पडू शकतो, अशी शक्यता या सर्वेक्षणातून वर्तवण्यात आली आहे.‘पोल ट्रॅकर’कडून लोकसभेच्या 543 मतदारसंघांमध्ये 3 जुलै ते 7 ऑगस्ट या कालावधीत हा सर्व्हे करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. या काळात अयोध्येतील राम मंदिरातील कथित घोटाळा आणि जंतर-मंतरवरील विद्यार्थी आंदोलनाचे मुद्दे चर्चेत होते.

सर्वेक्षणाच्या निकालानुसार, देशात लगेच लोकसभा निवडणूक झाली तर इंडिया आघाडीला 44 टक्के मतदान मिळण्याचा अंदाज असून, त्यांना 280 जागा मिळू शकतात. तर भाजपप्रणित एनडीएला 40 टक्के मतं मिळून त्यांच्या जागांचा आकडा 240 पर्यंत खाली येऊ शकतो.तर अन्य पक्षांना 16 टक्के मतं आणि लोकसभेच्या 23 जागा मिळण्याचा अंदाज या सर्वेक्षणात व्यक्त करण्यात आला आहे.

तसेच ‘पोल ट्रॅकर’च्या या सर्वेक्षणानुसार भारताचा पुढील पंतप्रधान म्हणून राहुल गांधी यांच्या नावाला 58 टक्के लोकांनी पसंती दिल्याचा दावा करण्यात आला आहे. तर नरेंद्र मोदी यांना भावी पंतप्रधान म्हणून केवळ 11 टक्के लोकांनी पसंती दिल्याचं सर्वेक्षणात म्हटलं आहे.सर्वेक्षणात सहभागी झालेल्या लोकांपैकी 43 टक्के लोक पंतप्रधान मोदी यांच्या कामावर समाधानी आहेत, तर 47 टक्के लोक असमाधानी असल्याचं सांगण्यात आलं आहे. तसेच 58 टक्के लोक एनडीए सरकारच्या कामगिरीवर नाराज असल्याचा निष्कर्ष या सर्वेक्षणात नोंदवण्यात आला आहे.

या सर्वेक्षणाच्या आकडेवारीनुसार, 61 टक्के लोक विरोधी पक्षनेता म्हणून राहुल गांधी यांच्या कामगिरीवर समाधानी असल्याचं सांगण्यात आलं आहे.देशातील तरुणांच्या चांगल्या भविष्यासाठी देशाचा भावी नेता म्हणून नरेंद्र मोदी यांच्या नावाला 23 टक्के, तर राहुल गांधी यांच्या नावाला तब्बल 69 टक्के लोकांनी पसंती दिल्याचा दावा या सर्वेक्षणातून करण्यात आला आहे.

दरम्यान, या सर्वेक्षणाच्या आकडेवारीवरून संजय राऊत यांनी भाजप आणि मोदी-शाह यांच्यावर निशाणा साधला आहे. मात्र, हे सर्वेक्षण प्रत्यक्ष निवडणुकीच्या निकालाची हमी नसून, सध्याच्या मतदारांच्या कलाचा अंदाज म्हणून पाहावं लागणार आहे.