देवगडमध्ये अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात एल्गार ; राजू शेट्टी आणि विनायक राऊतांचे 'जलसमाधी आंदोलन'
देवगड : येथील प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात देवगड येथे आंदोलनाचा भडका उडाला आहे. प्रकल्प रद्द करण्याच्या मागणीसाठी आज 'अणुऊर्जा संघर्ष समिती'च्या पुढाकाराने देवगडच्या समुद्रात ऐतिहासिक 'जलसमाधी आंदोलन' करण्यात आले. या आंदोलनात शेतकरी नेते राजू शेट्टी आणि माजी खासदार विनायक राऊत यांनी थेट समुद्रात उतरून प्रशासनाचा निषेध केला.

आंबा-काजू बागायतदार आणि व्यापारी एकवटले: हा प्रकल्प कोकणच्या पर्यावरणाला आणि शेतीला घातक असल्याचा आरोप करत देवगडमधील आंबा आणि काजू बागायतदार तसेच स्थानिक व्यापारी संघ पूर्ण ताकदीने या आंदोलनात उतरले आहेत. आंदोलकांनी दिलेल्या घोषणांनी देवगडचा समुद्रकिनारा दणाणून गेला होता. कोणतीही जीवितहानी किंवा अनुचित प्रकार घडू नये यासाठी किनारपट्टीवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
राजकीय पक्षांचा पाठिंबा आणि वाढता विरोध :
या आंदोलनाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) जाहीर पाठिंबा दिला आहे. "कोकणची हापूस आंबा आणि काजूची बागायती नष्ट करून हा विनाशकारी प्रकल्प लादू देणार नाही," असा इशारा यावेळी शेतकरी नेते राजू शेट्टी आणि विनायक राऊत यांनी सरकारला दिला. या आंदोलनामुळे अणुऊर्जा प्रकल्पाचा वाद आता पुन्हा एकदा पेटण्याची चिन्हे आहेत.




