20 दिवसांच्या उपोषणानंतर सोनम वांगचुक यांना हटवलं; पत्नीने प्रशासनावर गंभीर प्रश्न उपस्थित
मुंबई (प्रतिनिधी) : दिल्लीतील जंतर-मंतर येथे गेल्या 20 दिवसांपासून उपोषण करत असलेले शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांना शनिवारी सकाळी पोलिसांनी आंदोलनस्थळावरून हटवून रुग्णालयात दाखल केले. त्यांच्या प्रकृतीबाबत वेगवेगळी माहिती समोर येत असताना, पत्नी गीतांजली जे. अंग्मो यांनी प्रशासनाच्या कारवाईवर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

गीतांजली अंग्मो यांच्या म्हणण्यानुसार, शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या वैद्यकीय तपासणीत वांगचुक यांचे सर्व वाइटल्स सामान्य होते. मात्र, काही तासांतच पोटॅशियमची पातळी धोकादायकरीत्या कमी झाल्याचे सांगण्यात आले. त्यांनी संबंधित वैद्यकीय अहवालाची प्रत देण्यात आली नसल्याचा दावा करत संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता नसल्याचा आरोप केला.
तसेच, रुग्णालयात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त का ठेवण्यात आला आहे आणि कुटुंबीयांना त्यांच्याशी मुक्तपणे संपर्क का साधू दिला जात नाही, असे प्रश्नही त्यांनी उपस्थित केले.
आंदोलन थांबवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करत, नियोजित आंदोलन आणि यात्रा नियोजनाप्रमाणेच होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. वांगचुक सहभागी होऊ शकले नाहीत, तरी त्यांच्या वतीने आपण नेतृत्व करू, असेही त्यांनी सांगितले.दरम्यान, या प्रकरणावर प्रशासनाकडून अधिकृत भूमिका येण्याची प्रतीक्षा असून, संपूर्ण घटनेची चर्चा देशभर सुरू आहे.




