डी. वाय. पाटील ग्रुप व ‘गर्जे मराठी ग्लोबल’ मध्ये सामंजस्य करार

डी. वाय. पाटील ग्रुप व ‘गर्जे मराठी ग्लोबल’ मध्ये सामंजस्य करार

कोल्हापूर (प्रतिनिधी) - डी. वाय. पाटील ग्रुप, कोल्हापूर आणि ‘गर्जे मराठी ग्लोबल’ यांच्यात सामंजस्य करार (MoU) करण्यात आला. या करारानुसार विद्यार्थ्यांना स्टार्टअप्स, उद्योजकता, उच्च शिक्षण, परदेशी शिक्षणासाठी मार्गदर्शन, तसेच नेटवर्किंगच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. डी. वाय. पाटील ग्रुप आणि गर्जे मराठी ग्लोबल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘कोल्हापूर टू ग्लोबल’ या विशेष सेमिनारमध्ये हा करार करण्यात आला.

हॉटेल सयाजीच्या मेघमल्हार सभागृहात ‘कोल्हापूर टू ग्लोबल’ या विशेष सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शिक्षण, अभियांत्रिकी आणि उद्योग याविषयी चर्चा करण्यात आली. कार्यक्रमास डी वाय पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला प्रतिपादन ‘गर्जे मराठी ग्लोबल’चे संस्थापक अध्यक्ष आनंद गानू, सहसंस्थापक माधव दाबके, विश्वस्त ऋतुराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेशकुमार शर्मा, कार्यकारी संचालक डॉ. ए के गुप्ता यांची प्रमुख उपस्थिती होती. 

या कारारातर्गत गर्जे मराठीच्या जागतिक नेटवर्कमधील मेंटर्स विद्यार्थ्यांना व्यवसाय कल्पना, प्रोजेक्ट्स, स्टार्टअप ॲक्सेलरेशन याबाबत मार्गदर्शन करतील. तर डी. वाय. पाटील ग्रुपकडून या उपक्रमांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा आणि आयोजनाची जबाबदारी पार पाडली जाईल. विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यशाळा, सेमिनार, स्पर्धा, गुंतवणूकदारांशी संवाद यासारख्या उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून, गरजू विद्यार्थ्यांना मदतीच्या संधीही उपलब्ध करून दिल्या जातील.

यावेळी ‘गर्जे मराठी’चे अध्यक्ष आनंद गानू म्हणाले, कोल्हापूर ही संधीची खाण आहे. या संधीचा उपयोग करून जागतिक पातळीवर स्वतःची ओळख निर्माण करा. यासाठी ‘गर्जे मराठी’ सर्वोपरी मदत करेल. विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहेत. आम्ही प्रत्यक्षात तुम्हाला व्यवसाय नेटवर्कसाठी मदत करू असं सांगत देश, समाज, संस्कृती वृद्धिगंध करण्यासाठी सर्वांनी एकत्र प्रयत्न करूया असे आवाहन त्यांनी केले. आपले प्लस पॉइंट सांगा, मागायला लाजू नका, व्यक्त व्हा, कल्पना शेअर करा असा यशाचा कानमंत्रही त्यांनी दिला. 

विश्वस्त ऋतुराज पाटील म्हणाले, विद्यार्थी आणि इंडस्ट्रि या यामधील गॅप कमी करण्याचे काम ‘गर्जे मराठी’ करत आहे. जगभरातील मराठी माणसांना एकत्र करून एक चांगले व्यासपीठ निर्माण केले आहे. गर्जे मराठी ने एकूण २६ देशात पंधरा हजार पाचशेहून अधिक जणांना एकत्र करून नेटवर्क उभे केले आहे. नेटवर्किंग हेच उद्याचे भविष्य आहे. ‘गर्जे मराठी’ च्या या अनुभव व सहकार्याचा फायदा कोल्हापूरमधील विद्यार्थी, प्राध्यापक, उद्योजक, संघटना यांना व्हावा यासाठी आमदार सतेज पाटील यांच्या प्रयत्नातून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. डी वाय पाटील ग्रुप आणि ‘गर्जे मराठी’ मिळून एक चांगला प्लॅटफॉर्म उभा करू.

माधव दाबके म्हणाले, कोणत्याही इनोव्हेशनची सुरुवात समस्या ओळखण्यातून होते. त्यामुळे समस्या शोधआ, त्याच्यावर उपाय शोधण्याच्या प्रक्रियेतून नवसंशोधन घडेल. हे मला आवडतं, मला जमतंय, मला ते करायचं आहे, या त्रिसूत्रीनं मार्गक्रमण केल्यास यश हमखास मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच यासाठी लागणारी मदत ‘गर्जे मराठी’ करेल अशी ग्वाही त्यानी दिली.

दुपारच्या सत्रात आनंद गानू आणि माधव दाबके यांनी प्राध्यापकना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, शिक्षकांनी इंडस्ट्रीची गरज व संधी ओळखून त्याप्रमाणे विद्यार्थ्यांन अद्यावत ज्ञान द्यावे. विद्यार्थ्यांना प्रोजेक्टवर काम करण्यास उद्युक्त करावे त्यातून नवनिर्मिती व नव संशोधन घडेल. फॉरेन लँग्वेज, सॉफ्ट स्किल्स यावरही भर द्यावा. यासाठी कोणतेही तज्ञ मार्गदर्शन किंवा अन्य मदत देण्यास ‘गर्जे मराठी’ सदैव तयार आहे.

यावेळी डी. वाय. पाटील ग्रुपच्या सी.एच.आर.ओ श्रीलेखा साटम, ‘गर्जे मराठी’चे संग्रामसिंह जाधव यांच्यासह विविध संस्थंचे प्राचार्य, विभाग प्रमुख, प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. सुनंदा शिंदे केले. तर आभार नुपूर देशमुख यांनी मानले.