‘सात पिढ्या राजकारणात असल्या तरी मी जरांगे आहे, उखडून टाकू’; विखे-पाटलांवर मनोज जरांगेंचा संताप
मुंबई (प्रतिनिधी) : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील आणि मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यातील वाद पुन्हा चिघळला आहे. जरांगेंच्या भेटीसाठी आता सरकारचं कोणतंही शिष्टमंडळ अंतरवाली सराटीत जाणार नसल्याचं विखे-पाटील यांनी म्हटलं होतं. त्यावर मनोज जरांगे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

विखे-पाटील मराठ्यांचं नुकसान करत असल्याचा आरोप जरांगे यांनी केला. वर्षभर फक्त फडणवीसांचं गुणगान आणि शरद पवारांनी काही दिलं नाही, एवढंच सांगितलं जात होतं. मग मराठ्यांना वर्षभर कशाला नाचवलं, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. तुम्ही सपशेल अपयशी ठरलात आणि मराठ्यांना दगा दिला, अशी टीकाही जरांगे यांनी केली. अंतरवालीत येणार नसतील तर येऊ नका, असं म्हणत त्यांनी सरकारवरही निशाणा साधला.
यावेळी जरांगे पाटील यांनी आक्रमक शब्दांत इशारा देत, ‘तुझ्या सात पिढ्या राजकारणात असल्या तरी मी जरांगे आहे, उखडून टाकू,’ असं वक्तव्य केलं. विखे-पाटलांना उपसमितीच्या अध्यक्षपदावरून पळ काढता येणार नाही, असंही त्यांनी म्हटलं.
देवेंद्र फडणवीस मराठा आरक्षणासाठी ठोस निर्णय घेत नसून केवळ दिखावा सुरू असल्याचा आरोप जरांगे यांनी केला. मला जेलमध्ये टाकायचं असेल तर टाका, अशी भूमिकाही त्यांनी मांडली. दरम्यान, 12 तारखेला बैठक होणार असल्याचं आमचं ठरलं आहे, असं सांगत जरांगे पाटील यांनी आंदोलनाच्या पुढील भूमिकेचे संकेत दिले आहेत.




