"2029 मध्ये अमित शाह पंतप्रधान? राज ठाकरेंचा मोठा राजकीय दावा"

"2029 मध्ये अमित शाह पंतप्रधान? राज ठाकरेंचा मोठा राजकीय दावा"

मुंबई (प्रतिनिधी) : मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मुंबईतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना 2029 च्या लोकसभा निवडणुकीसंदर्भात मोठा राजकीय दावा केला.आगामी काळात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पंतप्रधानपदासाठी तयारी करत असल्याचे सांगत त्यांनी अलीकडील राजकीय घडामोडींवर भाष्य केले.

राज ठाकरे म्हणाले की, ठाकरे गटातील सहा खासदार थेट भाजपमध्ये न जाता एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत दाखल झाले. यामागे भविष्यातील राजकीय रणनीती असू शकते, असा त्यांचा अंदाज आहे. "जर केंद्रात भाजपची सत्ता आहे, तर हे खासदार भाजपमध्ये का गेले नाहीत?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला.यावेळी त्यांनी भाजपमध्ये अंतर्गत मतभेद असल्याचाही दावा केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामुळे सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगत, भविष्यात राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल होऊ शकतात, असेही ते म्हणाले.

मनसे कार्यकर्त्यांना संबोधित करताना राज ठाकरे यांनी 2029 च्या निवडणुकांसाठी आतापासून तयारी करण्याचे आवाहन केले. मतदार यादी, जनगणना आणि स्थानिक पातळीवरील घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.तसेच, आगामी जनगणना प्रक्रियेदरम्यान पारदर्शकता आणि मतदार नोंदणीसंदर्भातील बाबींवर लक्ष ठेवण्याचे आवाहनही त्यांनी केले. पुढील काही वर्षांत राजकीय परिस्थितीत मोठे बदल होण्याची शक्यता असल्याचे सांगत त्यांनी कार्यकर्त्यांना संघटन मजबूत करण्याचा सल्ला दिला.