४५ दिवस पोलिसांना फिरवलं, पण एका चुकीमुळे झाली थेट जेल! आग्र्यातील भयंकर मर्डर मिस्ट्री
आग्रा: उत्तर प्रदेशातील आग्रामधून एक काळजाचा थरकाप उडवणारी आणि क्रूरतेच्या सर्व सीमा पार करणारी घटना समोर आली आहे. एका पत्नीने अत्यंत थंड डोक्याने स्वतःच्या पतीचा काटा काढला आणि हत्येचा पुरावा नष्ट करण्यासाठी चक्क मृतदेह घराच्या बाथरूमच्या जमिनीखाली गाडून टाकला. इतकेच नाही तर त्यावर सिमेंटचा थर देऊन नव्या फरश्याही बसवून घेतल्या. तब्बल ४५ दिवस ही महिला पती बेपत्ता असल्याचे नाटक करत नातेवाईक आणि पोलिसांची दिशाभूल करत होती. मात्र, पोलिसांच्या एका 'रुटीन व्हेरीफिकेशन'मुळे या भयंकर गुन्ह्याचा पर्दाफाश झाला आहे.

मुलींना घराबाहेर पाठवून रचला कट: मृत ४४ वर्षीय सुरेंद्र शर्मा हे आपली पत्नी रूबी शर्मा आणि दोन मुलींसह आग्रा येथील रेणुका धाम कॉलनीत राहत होते. १८ मे रोजी रूबीने पतीच्या हत्येचा कट रचला. तिने आधी दोन्ही मुलींना सुरेंद्र यांच्या मोठ्या भावाच्या घरी पाठवून दिले. घरात कोणीही नसताना तिने सुरेंद्र यांना रात्री खिरीमध्ये गुंगीच्या गोळ्या मिसळून दिल्या. सुरेंद्र बेशुद्ध पडल्यानंतर तिने गळा आवळून त्यांचा जीव घेतला.
बाथरूममध्ये खणला खड्डा अन्...
हत्या केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी सकाळी रूबीने बाथरूममध्ये एक मोठा खड्डा खणला. यासाठी तिने आधीच मिस्त्री आणि मजूर बोलावून ठेवले होते. तिने सुरेंद्र यांचा मृतदेह त्या खड्ड्यात गाडला आणि मिस्त्रीकडून वरून पुन्हा सिमेंट टाकून नव्या फरश्या बसवून घेतल्या, जेणेकरून कोणालाही संशय येऊ नये. २६ मे रोजी तिने स्वतः पोलीस ठाण्यात पती बेपत्ता झाल्याची तक्रारही नोंदवली.
असा झाला भयंकर खुलासा:
हे हत्याकांड तब्बल दीड महिना जगापासून लपून राहिले. मात्र, एका जुन्या प्रकरणात सुरेंद्र यांच्या कागदपत्रांच्या पडताळणीसाठी पोलिसांचे एक पथक अचानक त्यांच्या घरी पोहोचले. पोलिसांच्या चौकशी दरम्यान रूबी प्रचंड घाबरली. तिची संशयास्पद वर्तणूक पाहून तिथे आलेल्या सुरेंद्र यांच्या भावाने, म्हणजेच अनिल शर्मा यांनी तिला थेट विचारले, "सुरेंद्र कुठे आहेत?" यावर आधी तिने उडवाउडवीची उत्तरे दिली, पण पोलिसी खाक्या दाखवताच तिने "बाथरूमच्या फर्शखाली" अशी धक्कादायक कबुली दिली.
बाथरूमची फरशी तोडताच पोलीसही हादरले:
रूबीने गुन्हा कबूल केल्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत बाथरूमची सिमेंटची फरशी तोडली. खालील माती बाजूला केल्यावर पोलिसांना सुरेंद्र शर्मा यांचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडला.
स्थानिक पोलिसांच्या माहितीनुसार, या पती-पत्नीमध्ये नेहमी घरगुती भांडणे होत असत. सध्या आरोपी पत्नी रूबी शर्मा हिला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, या कटात तिला आणखी कोणी मदत केली होती का, याचा सखोल तपास पोलीस करत आहेत.




