वाहतूकदारांनो लक्ष द्या ! 'आंबेनळी घाट' पुढील ४ दिवस सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद

वाहतूकदारांनो लक्ष द्या ! 'आंबेनळी घाट' पुढील ४ दिवस सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद

सातारा (महाबळेश्वर) : पर्यटकांचे आवडते ठिकाण असलेल्या महाबळेश्वर आणि परिसरामध्ये गेल्या दोन दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. संपूर्ण परिसर सध्या दाट धुक्याच्या चादरीत हरवून गेला असून, वेगाने वाहणारे वारे, सतत कोसळणारा पाऊस आणि अत्यंत कमी दृश्यमानता (Low Visibility) यामुळे घाटमाथ्यावर सध्या अत्यंत धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे.

या पार्श्वभूमीवर, पावसाळ्यात दरड कोसळण्याचा मोठा धोका लक्षात घेऊन रायगड जिल्हा प्रशासनाने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महाबळेश्वर ते पोलादपूर जोडणारा प्रसिद्ध आंबेनळी घाट ३ ते ६ जुलै २०२६ या कालावधीत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्याचा आदेश जारी करण्यात आला आहे.

प्रशासनाचे प्रवाशांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन: घाट रस्ता बंद असल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी प्रशासनाने खालील पर्यायी मार्ग वापरण्याचे आवाहन केले आहे:

 मुंबई- गोवा हायवेवरून प्रवास करणाऱ्यांसाठी माणगाव, ताम्हिणी घाट, पुणे, सातारा असा मार्ग उपलब्ध असेल. तसेच पोलादपूर, चिपळूण, कुंभार्ली घाट, पाटण, सातारा आणि कोल्हापूर या मार्गाचा वापर प्रवाशांना करता येईल.

त्यामुळे जर तुम्ही पुढील चार दिवसांत महाबळेश्वर किंवा कोकणाच्या दिशेने आंबेनळी घाटातून प्रवास करण्याचा प्लॅन करत असाल, तर तो त्वरित बदला आणि प्रशासनाने दिलेल्या पर्यायी मार्गांचाच वापर करा, जेणेकरून तुमचा प्रवास सुरक्षित होईल.