संतापलेल्या शंभुराज देसाईंनी तुषार दोषींचा अंतरवाली सराटीतील लाठीमाराचा मुद्दा उकरुन काढला

संतापलेल्या शंभुराज देसाईंनी तुषार दोषींचा अंतरवाली सराटीतील लाठीमाराचा मुद्दा उकरुन काढला

सातारा (प्रतिनिधी) : सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीवेळी पोलिसांकडून झालेल्या धक्काबुक्कीमुळे संतापलेले शिवसेनेचे मंत्री शंभुराज देसाई यांनी विधिमंडळात आपला राग व्यक्त केला. यावेळी त्यांनी सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी आगपाखड केली. आम्हाला दहा-दहा पोलीस मिळून ओढतो होते. कोणी आमच्या दंडाला, कोणी पायाला, कोणी कंबरेला पकडले होते. एखाद्या गुन्ह्यातील आरोपीला पकडतात तसे पोलीस मंत्र्यांना धरुन खेचत होते. याप्रकरणी विधानपरिषदेच्या सभापतींनी पोलीस अधीक्षक तुषार दोशींच्या निलंबनाचे आदेश दिले आहेत. मात्र, निवृत्त न्यायाधीशांमार्फत या प्रकरणाची चौकशी करताना तुषार दोषींच्या या आधीच्या कारकीर्दीचीही चौकशी केली जावी, अशी मागणी शंभुराज देसाई यांनी केली. 

तुषार दोशींबात बोलताना अंतरवाली सराटीचा उल्लेख सभागृहात झाला. अंतरवाली सराटीत मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज झाला तेव्हा एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होते. एकनाथ शिंदेंनी दोनवेळेला मला तिकडे पाठवले होते, अंतरवाली सराटीत प्रचंड उद्रेक होता. त्यावेळी तुषार दोशींना तिथून का काढले. अंतरवाली सराटीत गोळीबार झाला, लाठीमार केला, त्यावेळी जालन्यातून तुषार दोशींना काढण्यात आले. त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड काढा. वर्षभर साताऱ्यात काय चालले आहे? रेल्वे पोलीसमधील कुठला कर्मचारी इथे आणून बसवलाय, कोणते उद्योग करण्यासाठी त्याला बसवलाय, अशी टीका शंभुराज देसाई यांनी केली. 

पोलीस अधीक्षक तुषार दोशींच्या सांगण्यावरुन पोलीस निरीक्षक देवकर, सहाय्यक निरीक्षक गर्जे आणि 100 साध्या वेषातील पोलीस या सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे. मकरंद पाटील आणि मी कोणत्या पोलिसांनी आम्हाला धरुन खेचले, हे चेहरे बघून सांगू शकतो, असेही शंभुराज देसाई यांनी म्हटले.