पुण्यातील बांगलादेशी शोधून काढून ,परत पाठवा - किरीट सोमय्या
पुणे (प्रतिनिधी) : संपूर्ण महाराष्ट्रात किमान ५० लाख बोगस बांगलादेशी मतदार आहेत. महाराष्ट्रात १ एप्रिलपासून ‘एसआयआर’ सुरू होणार आहे. ‘पश्चिम बंगालमध्ये ६४ लाख बोगस मतदार तर बिहारमध्ये ५७ लाख बोगस मतदार सापडले. त्यामुळे महाराष्ट्रात ५० लाख तर पुण्यात ४०-५० हजार बांगलादेशी नागरिक बेकायदेशीरित्या राहात असल्याचा माझा अंदाज आहे. त्यामुळे जन्मदाखले तपासून पुण्यातील बांगलादेशी शोधून काढून त्यांना परत पाठवा’, अशा सूचना भाजपचे नेते, माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पुणे महापालिकेतील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना केल्या.

महापौर मंजूषा नागपुरे, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, गटनेते गणेश बीडकर, महापालिका आयुक्त नवल किशोर राम, अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर, गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त शैलेश संके, आरोग्यप्रमुख डॉ. नीना बोराडे, संगणक व तंत्रज्ञान विभाग प्रमुख राहुल जगताप यांच्यासह अधिकारी, संबंधित विभागप्रमुख आदींची बैठक सोमय्या यांनी महापालिकेत घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ‘पुणे महापालिकेने गेल्या तीन वर्षांत दिलेली जन्म प्रमाणपत्र तपासा, तसेच घरोघरी जाऊन छाननी करा. जी व्यक्ती येथे जन्मली नाही त्याची माहिती काढा, त्यांच्या आईवडिलांच्या जन्मठिकाणाची माहिती घ्या. जी व्यक्ती येथे जन्मलीच नाही, त्याचे पुरावे नाहीत त्यांच्यावर कारवाई करा,’ अशा सूचना दिल्याचे सोमय्या म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील राज्य सरकारने गेल्या वर्षभरात तीन लाख बोगस जन्म प्रमाणपत्र रद्द केले आहेत. रोहिंग्यांच्या घुसखोरीबाबतही राज्य सरकारने नवीन कार्यपद्धती (एसओपी) बनवली आहे. कामगार मंत्र्यांनी या संदर्भात निर्देश दिले आहेत. विधानसभेचे अधिवेशन संपल्यानंतर ‘कोम्बिंग ऑपरेशन’ होईल, असे सोमय्या यांनी सांगितले.




