मुंबईतील मैदानांवरून आदित्य ठाकरेंचा भाजपवर निशाणा; ‘मोकळ्या जागा वाचवण्यासाठी मुंबईकरांनी एकत्र या’
मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील मोकळ्या जागा आणि खेळाची मैदानं वाचवण्याच्या मुद्द्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी सत्ताधारी भाजपवर जोरदार टीका केली आहे. वांद्रे येथील नेव्हिल डिसोझा फुटबॉल मैदानाच्या आरक्षण बदलण्याच्या मुद्द्यावरून त्यांनी सरकार आणि महापालिकेवर गंभीर आरोप केले. तसेच मुंबईतील मोकळ्या जागा वाचवण्यासाठी रविवारी तिरंगा हातात घेऊन मोठ्या संख्येने मुंबईकरांनी एकत्र यावे, असे आवाहन त्यांनी केले.

नेव्हिल डिसोझा फुटबॉल मैदानाचे आरक्षण बदलून त्या ठिकाणी प्रदर्शन किंवा कन्व्हेन्शन सेंटर उभारण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप आहे. या निर्णयाविरोधात मुंबई फुटबॉल असोसिएशनने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. न्यायालयानेही पुढील सुनावणीपर्यंत मैदानाबाबत कोणतीही पुढील कार्यवाही करू नये, असे निर्देश दिले आहेत.
याच मुद्द्यावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, “नेव्हिल डिसोझा ग्राउंडच्या अनुषंगाने कोर्टात सुनावणी आहे. ग्राउंडबाबत काय होतं ते बघूया. मुंबईतील मोकळ्या जागा आणि मैदानं वाचवण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे.”आदित्य ठाकरे यांनी भाजपवर टीका करताना, “भाजप झेन-जी विरोधी आहे. खेळाची मैदानं घेतली जात आहेत,” असा आरोप केला. मुंबईतील विविध मोकळ्या जागांचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी मैदानं आणि सार्वजनिक जागा खासगी किंवा इतर प्रकल्पांसाठी वापरण्याला विरोध दर्शवला.
“रविवारी सायंकाळी पाच वाजता हातात तिरंगा घेऊन या. कोणत्याही पक्षाचा झेंडा घेऊ नका. मुंबईतील मोकळ्या जागा वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे,” असे आवाहन त्यांनी मुंबईकरांना केले.नेव्हिल डिसोझा मैदानाबाबतच्या सुनावणीदरम्यान मुंबई उच्च न्यायालयानेही मैदानं आणि मोकळ्या जागांच्या गरजेवर भाष्य केले होते. मुलांनी मैदानी खेळ कुठे खेळायचे, यासाठी काही जागा मोकळ्या ठेवणे गरजेचे आहे, अशी भूमिका न्यायालयाने मांडली.या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील मैदानं वाचवण्याची मागणी केली. याप्रकरणी पुढील सुनावणी 10 सप्टेंबरला होणार आहे.
आदित्य ठाकरे यांनी महापालिका प्रशासन आणि महापौरांवरही टीका केली. सोशल मीडिया आणि इतर बाबींवर महापालिकेचा खर्च होत असल्याचा दावा करत त्यांनी हा पैसा मुंबईकरांचा असल्याचे म्हटले.“भाजपला प्रशासन आणि सरकार चालवता येत नाही. मुंबईकरांच्या पैशांचा योग्य वापर झाला पाहिजे,” अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली. यावेळी त्यांनी महापौर निवासस्थान आणि त्यासंदर्भातील खर्चावरूनही सत्ताधाऱ्यांना टोला लगावला.




