कागल नगरपालिका निवडणुकीसाठी इच्छूकांच्या राजे समरजितसिंह घाटगे यांनी घेतल्या मुलाखती

कागल नगरपालिका निवडणुकीसाठी इच्छूकांच्या राजे समरजितसिंह घाटगे यांनी घेतल्या मुलाखती

कागल (प्रतिनिधी) - कागल येथे शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी कागल नगरपालिकेच्या नगराध्यक्षांसह अकरा प्रभागातील नगरसेवक पदाची निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. इच्छूकांनी घाटगे यांच्याकडे आपल्यालाच उमेदवारी द्यावी, यासाठी आपली बाजू प्रभावीपणे मांडत आग्रही भुमिका घेतली.

दिवसभर सकाळच्या सत्रात महिला कार्यकर्त्यांशी संवाद तर दुपारपासून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती यामुळे घाटगे यांच्या या मॅरेथॉन बैठकांच्या धडाक्याची कार्यकर्त्यांत जोरदार चर्चा सुरू होती.

कागल नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत नगराध्यक्षांसह अकरा प्रभागातून तेवीस नगरसेवक पदासाठीच्या उमेदवारांसह एकूण चोवीस उमेदवार निवडून द्यावयाचे आहेत.नगराध्यक्ष पदासाठी येथील आरक्षण सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित आहे. नगराध्यक्षांसह नगरसेवक पदाची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुकांनी घाटगे यांच्यासमोर जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपल्या उमेदवारीसाठी दावेदारी केली.   

भ्रष्टाचारमुक्त, पारदर्शी व सर्वसामान्य नागरिकांच्या विकासाभिमुख कारभारासाठी आपल्या गटाची सत्ता आणण्यासाठी सर्वांनी एकदिलाने कामाला लागावे - राजे समरजितसिंह घाटगे 

मॅरेथॉन मुलाखतीच्या कार्यक्रमानंतर बोलताना राजे समरजितसिंह घाटगे म्हणाले, सर्वच इच्छुक उमेदवारीसाठी पात्र आहेत,मात्र निवडून द्यावयाच्या मर्यादित जागांमुळे सर्वांना संधी मिळणार नाही.गटाच्या शिस्तीप्रमाणे उमेदवारीबाबत सर्वानुमते निर्णय घेतला जाईल.उमेदवारी निश्चित झाल्यानंतर सर्वांनी नगरपालिकेत भ्रष्टाचारमुक्त,पारदर्शी व सर्वसामान्य नागरिकांच्या विकासाभिमुख कारभारासाठी आपल्या गटाची सत्ता आणण्यासाठी सर्वांनी एकदिलाने कामाला लागावे.