मोठी बातमी ; ठाकरेंनंतर पुणे महापालिकेसाठी दोन्ही पवार एकत्र येणार..?

मोठी बातमी ; ठाकरेंनंतर पुणे महापालिकेसाठी दोन्ही पवार एकत्र येणार..?

मुंबई - राज्यातील आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रमुख राजकीय पक्षांच्या भूमिकांमध्ये मोठे बदल दिसून येत आहेत. मुंबई महापालिका ठाकरेंच्या ताब्यात ठेवण्यासाठी ठाकरे बंधू एकत्र येत असून, मनसे - शिवसेना (ठाकरे गट) युतीची अधिकृत घोषणा उद्या दुपारी 12 वाजता होणार आहे. ठाकरेंनंतर आता पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. महापालिका निवडणुकांमुळे मुंबईसाठी ठाकरे तर पुण्यासाठी पवार एकत्र येत असल्याचं चित्र आहे. याबाबत 26 डिसेंबर रोजी अधिकृत घोषणा होणार असल्याची माहिती स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.

कार्यकर्त्यांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, 26 तारखेला दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या युतीची अधिकृत घोषणा केली जाईल. कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, सर्व गोष्टी त्या दिवशी स्पष्ट होतील, असं आवाहनही त्यांनी केलं. यासंदर्भात उद्या उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबईत आढावा बैठक घेणार आहेत.

दरम्यान, दोन राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चेनंतर शरद पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्यास आपण पक्षातून राजीनामा देऊ, असा इशारा दिला होता. मात्र, या इशाऱ्याचा युतीच्या हालचालींवर फारसा परिणाम झाल्याचं दिसत नाही.

पुण्यात भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी सर्व पक्षांची आघाडी उभारण्याचा प्रस्ताव तयार केला जात आहे. यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन ठाकरे गटाच्या शिवसेनेलाही सोबत घेण्याची चर्चा सुरू आहे. असा प्रस्ताव अजित पवारांना दिला जाणार असल्याची माहिती शशिकांत शिंदे यांनी दिली आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार हा प्रस्ताव स्वीकारणार का, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. या घडामोडींमुळे पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार महाविकास आघाडीसोबत जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पुणे महानगरपालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार असून, 25 किंवा 26 डिसेंबर रोजी युतीची घोषणा होईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे शहराध्यक्ष सुभाष जगताप यांनी दिली आहे.

प्रशांत जगताप यांच्या इशाऱ्यानंतर पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची गुप्त बैठक सुरू असल्याची माहिती आहे. त्यामुळे युतीच्या हालचालींना आणखी वेग आला आहे. या बैठकीत शरद पवार गटाकडून अंकुश काकडे, विशाल तांबे तर अजित पवार गटाकडून सुभाष जगताप आणि सुनील टिंगरे उपस्थित आहेत. स्थानिक पातळीवरील चर्चेनंतर वरिष्ठ नेत्यांना अहवाल पाठवला जाणार असून, पुणे महापालिका निवडणूक आणि इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा होण्याची शक्यता आहे.