नाशिकमध्ये महायुतीतच 'करेक्ट कार्यक्रम'; शिंदेंच्या शिवसेनेचे ७ नगरसेवक भुजबळांच्या गळाला?

नाशिकमध्ये महायुतीतच 'करेक्ट कार्यक्रम'; शिंदेंच्या शिवसेनेचे ७ नगरसेवक भुजबळांच्या गळाला?

नाशिक: नाशिक विधानपरिषद निवडणुकीच्या निकालानंतर जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. या निवडणुकीत महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागल्यानंतर आता येवल्यातील शिवसेनेत मोठी बंडखोरी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिवसेनेचे (शिंदे गट) सात नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षात सामील होण्याच्या तयारीत असून पडद्यामागे वेगाने हालचाली सुरू आहेत. महायुतीतच झालेल्या या अंतर्गत कुरघोडीमुळे शिवसेनेला मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, माजी खासदार आणि राष्ट्रवादीचे नेते समीर भुजबळ यांच्या उपस्थितीत नुकतीच महायुतीच्या या नगरसेवकांची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. शिवसेनेचे हे सातही नगरसेवक आमदार किशोर दराडे आणि कुणाल दराडे यांच्या कार्यशैलीवर तीव्र नाराज आहेत. हीच नाराजी त्यांनी भुजबळ यांच्यासोबत झालेल्या बैठकीत बोलून दाखवल्याची खात्रीलायक माहिती आहे. जर हे नगरसेवक राष्ट्रवादीत गेले, तर आमदार किशोर दराडे यांच्यासाठी हा मोठा राजकीय धक्का मानला जाईल.

नाशिक विधानपरिषदेत अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी मिळवलेल्या विजयानंतर येवल्यातील दराडे बंधूंची राजकीय पकड सैल होऊ लागल्याचे चित्र आहे. या राजकीय चर्चांवर प्रतिक्रिया देताना समीर भुजबळ म्हणाले की, "महायुतीचे नगरसेवक म्हणून ते आमच्याकडे आले आहेत. आम्ही महायुती म्हणून एकत्र काम करू." भुजबळ यांनी यावर सावध भूमिका घेतली असली तरी या गुप्त बैठकीमुळे नाशिकच्या राजकारणात आगामी काळात मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता नाकारता येत नाही.