शिवसेना प्रवक्त्या शायना एन.सी. यांचे व्हॉट्सॲप हॅक; 'मदत' मागून हॅकर्सनी ८ जणांना तब्बल ३.९२ लाखांना लुटले, पोलिसांच्या दिरंगाईवर संताप
मुंबई: राजकीय वर्तुळातून सायबर गुन्हेगारीची एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या राष्ट्रीय प्रवक्त्या आणि प्रसिद्ध फॅशन डिझायनर शायना एन.सी. यांचे अधिकृत व्हॉट्सॲप खाते हॅकर्सनी हॅक केले आहे. यानंतर हॅकरने त्यांच्या खात्यावरून संपर्कातील लोकांना पैशांची मागणी करणारे मेसेज पाठवून अवघ्या काही तासांत तब्बल ३ लाख ९२ हजार रुपयांची फसवणूक केली. या हाय-प्रोफाईल प्रकरणामुळे व्हीआयपी (VIP) व्यक्तींच्या सायबर सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

अशी झाली फसवणूक
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी हॅकरने शायना एन.सी. यांचे व्हॉट्सॲप खाते आपल्या ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांच्या ओळखीच्या लोकांना 'मला तातडीने पैशांची मदत हवी आहे' असे भासवणारे मेसेज पाठवले. हॅकरने समोरच्या व्यक्तींना प्रत्येकी ४९,००० रुपये पाठवण्याची विनंती केली आणि हे पैसे दोन तासांत परत करण्याचे आश्वासन दिले. शायना एन.सी. यांच्या नावावर विश्वास ठेवून ८ जणांनी प्रत्येकी ४९,००० रुपये पाठवले आणि हॅकरने काही वेळातच एकूण ३ लाख ९२ हजार रुपयांवर डल्ला मारला.
पोलिसांच्या कार्यपद्धतीवर शायना एन.सी. आक्रमक
आपले व्हॉट्सॲप खाते हॅक झाल्याचे लक्षात येताच शायना एन.सी. यांच्या टीमने गुरुवारी दुपारी १:५८ वाजता पोलिसांकडे अधिकृत तक्रार नोंदवली होती. हॅकर्सनी ज्या गुगल पे (Google Pay) खात्यावर पैसे मागवले होते, ते बँक खाते तातडीने ब्लॉक करण्याची विनंतीही पोलिसांना करण्यात आली होती.
मात्र, पोलिसांनी यावर वेळेत कारवाई केली नाही, असा गंभीर आरोप स्वतः शायना एन.सी. यांनी केला आहे. जर पोलिसांनी तक्रार मिळताच तातडीने पावले उचलली असती, तर डिजिटल व्यवहार थांबवून लोकांची आर्थिक फसवणूक टाळता आली असती, अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली. पोलिसांच्या या दिरंगाईबद्दल त्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे थेट नाराजी व्यक्त केली आहे.
सायबर पोलिसांकडून तपास सुरू
या संपूर्ण प्रकरणावर तीव्र असंतोष व्यक्त करताना शायना एन.सी. म्हणाल्या की, पोलीस फक्त 'आम्ही शोध घेत आहोत आणि तपास सुरू आहे' असे तांत्रिक उत्तर देत आहेत. तपासाच्या संथ गतीबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, सायबर पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून हॅकर्सचा माग काढण्यासाठी पुढील तपास सुरू केला आहे.




