बुद्धिबळाच्या पटावर शरद पवारांची मास्टर चाल! राजा-वजीराला हात घालताच सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

बुद्धिबळाच्या पटावर शरद पवारांची मास्टर चाल! राजा-वजीराला हात घालताच सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्राच्या राजकारणातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या राजकीय डावपेचांची चर्चा नेहमीच होत असते. मात्र, यावेळी बारामती दौऱ्यात त्यांच्यातील खेळाडूवृत्ती पुन्हा एकदा पाहायला मिळाली. सुपे येथील विद्या प्रतिष्ठानच्या शाळेला भेट देताना विद्यार्थ्यांनी त्यांच्यासमोर बुद्धिबळाचा पट आणला.

बुद्धिबळाचा पट पाहताच शरद पवार यांनी उत्सुकतेने खेळात सहभाग घेतला आणि थेट राजा व वजीराच्या मोहऱ्यांना हात लावत एक चाल खेळली. हा खास क्षण उपस्थितांनी कॅमेऱ्यात टिपला असून त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

या भेटीदरम्यान शरद पवार यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या विविध उपक्रमांची माहिती घेतली. विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेचे, बुद्धिमत्तेचे आणि नेतृत्वगुणांचे त्यांनी कौतुक केले. बदलत्या काळातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी विचारशक्ती, आत्मविश्वास आणि कौशल्य विकास महत्त्वाचा असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

राजकारणाच्या पटावर अनेक डावपेच खेळणारे शरद पवार बुद्धिबळाच्या पटावरही तितक्याच सहजतेने चाल खेळताना दिसल्याने हा प्रसंग चर्चेचा विषय ठरला आहे.