अभूतपूर्व विजय नव्हे, तर अभूतपूर्व पैसे वाटण्याची ही किमया - संजय राऊत
मुंबई - राज्यातील नगरपालिका निवडणुकांमध्ये भाजप महायुतीला मिळालेलं यश अभूतपूर्व असल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. मात्र, या दाव्यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी तीव्र टीका करत गंभीर आरोप केले आहेत. हा विजय हॅट्रिक, मॅट्रिक किंवा सॅट्रिक नसून पैशांचा पाऊस पाडून मिळवलेला आहे. नगरपंचायत निवडणुकांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मिळून सुमारे 15 हजार कोटी रुपये खर्च केले, मतदारांना पैसे वाटले गेले आणि पैसा पाण्यासारखा वाहिला, असा आरोपही संजय राऊत यांनी केला. अभूतपूर्व विजय नव्हे, तर अभूतपूर्व पैसे वाटण्याची ही किमया असल्याचेही राऊत म्हणाले.

महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बोलताना राऊत यांनी ठाकरे बंधूंमधील जागावाटप अंतिम टप्प्यात असून आज सायंकाळपर्यंत युतीची अधिकृत घोषणा होण्याचे संकेत दिले. याचवेळी त्यांनी भाजप महायुतीच्या विजयावर पुन्हा एकदा पैसे वाटपाचे आरोप करत टीका केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही राऊत यांनी हल्ला चढवला. तुम्हाला मिळालेली शिवसेना अमित शहा यांनी दिलेली आहे. त्यामुळे त्यांचे पाय धुवून तीर्थ प्या, त्या शिवसेनेचं पुण्य खूप मोठं आहे,अशा शब्दांत त्यांनी शिंदेंवर टोला लगावला.
निवडणूक चिन्ह आणि पक्षासंदर्भातील प्रकरण अजूनही सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याकडे लक्ष वेधत राऊत यांनी न्यायालयावर दबाव असल्याचा आरोप केला. माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणात सहा तासांत निर्णय होतो, पण 40 आमदारांनी पक्ष बदलल्याच्या गंभीर विषयावर अजून निर्णय होत नाही, असे म्हणत त्यांनी नाराजी व्यक्त केली. 21 जानेवारी ही पुढील तारीख देण्यात आल्याचा उल्लेख करत, निवडणुकांनंतरही न्याय न मिळाल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.




