'शाहू' च्या अमोल खोत यांना व्हीएसआयचा मानाचा 'ऊस भूषण' पुरस्कार जाहीर
कागल (प्रतिनिधी) - छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना, कागलचे ऊस उत्पादक सभासद करनूर (ता. कागल) येथील प्रगतशील शेतकरी अमोल कुमार खोत यांना वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे (व्हीएसआय) यांच्यामार्फत दिला जाणारा मानाचा 'ऊस भूषण पुरस्कार' जाहीर झाला. सन २०२४ - २५ गळीत हंगामासाठी, दक्षिण विभागातील पूर्व हंगाम लागण गटात सर्वाधिक ऊस उत्पादन घेत त्यांनी या पुरस्काराला गवसणी घातली. शाहू कारखान्याकडे गळीतास आलेल्या को - ८६०३२ या ऊस जातीचे हेक्टरी २८१.६३ मे. टन इतके विक्रमी उत्पादन त्यांनी घेतले. तसेच शाहू साखर कारखान्याचे विद्यमान ऊस विकास अधिकारी सुजयकुमार पाटील यांना राजारामबापू पाटील कारखान्याकडील २०२४ - २०२५ या सेवा कालावधीसाठी उत्कृष्ट ऊस विकास अधिकारी हा पुरस्कार जाहीर झाला.त्याबद्दल शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी शेतकरी अमोल खोत यांच्यासह ऊस विकास अधिकारी पाटील यांचा सत्कार केला.

शाहू कारखान्याचे संस्थापक दिवंगत विक्रमसिंहराजे घाटगे यांनी कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांचे ऊस उत्पादन वाढावे यासाठी सातत्याने नवे प्रयोग, तंत्रज्ञान आणि उपक्रम राबविले होते.शाहूच्या सभासद शेतकऱ्याने व्हीएसआयचा ऊस भूषण पुरस्कार मिळवावा, अशी त्यांची मनस्वी इच्छा होती. त्यांच्या पश्चात शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनीही शेतकऱ्यांना हे स्वप्न पूर्ण करण्याचे आवाहन केले होते.अमोल खोत यांनी हा पुरस्कार पटकावून दिवंगत विक्रमसिंहराजे घाटगे यांचे स्वप्न साकार केले.
त्यांना कारखान्याच्या अध्यक्षा सुहासिनीदेवी घाटगे, शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे, उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, कर्नाटकचे माजी मंत्री व ज्येष्ठ संचालक वीरकुमार पाटील, सर्व संचालक व कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण यांचे प्रोत्साहन लाभले. शेती अधिकारी दिलीप जाधव व शेती विभागाचे मार्गदर्शन मिळाले.
याशिवाय शाहू कारखान्याचे संस्थापक दिवंगत विक्रमसिंहराजे घाटगे यांच्या सहकारी साखर कारखानदारीतील अतुलनीय योगदानाची दखल घेऊन साखर उद्योगात तांत्रिकदृष्ट्या सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या साखर कारखान्यास व्हिएसआयच्यावतीने यावर्षीपासून "कै. राजे विक्रमसिंह घाटगे उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार" या राज्य पातळीवरील पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. लातुरचा विलास सहकारी साखर कारखाना ( युनिट २) व पुण्याचा वेंकटेशकृपा शुगर मिल्स हे संयुक्तपणे या पहिल्या पुरस्काराचे मानकरी ठरले.
२०२४ - २५ या आर्थिक वर्षातील विविध राज्यस्तरीय आणि विभागस्तरीय पुरस्कारांची घोषणा महासंचालक संभाजी कडू - पाटील यांनी बुधवारी (२४ डिसेंबर) रोजी केली. संस्थेचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत व्हीएसआयच्या सोमवारी (२९डिसेंबर) रोजी मांजरी येथे होणा-या ४९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत पुरस्कार वितरण होणार आहे.
१) शाहू कारखान्याच्या सभासद शेतकऱ्याने व्हीएसआयचा ऊस भूषण पुरस्कार मिळवावा, हे स्व. विक्रमसिंहराजे घाटगे यांचे स्वप्न होते. अमोल खोत यांनी ते प्रत्यक्षात आणले. ही संपूर्ण शाहू परिवारासाठी अभिमानाची बाब आहे - राजे समरजितसिंह घाटगे (अध्यक्ष शाहू ग्रुप)
२) "व्हीएसआयचा ऊस भुषण हा मानाचा पुरस्कार मिळणे सन्मानाचे आहे.शाहू कारखान्याचे मार्गदर्शन, आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि मेहनतीच्या जोरावर हे यश मिळाले.दिवंगत विक्रमसिंहराजे घाटगे यांचे स्वप्न पूर्ण करता आले, याचा विशेष आनंद आहे - अमोल खोत




