दिव्यांग बांधवांसाठी रविवारी आरोग्य तपासणी शिबीर
कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर महानगरपालिका व अलीम्को कंपनीमार्फत समाजकल्याण विभागांतर्गत दरवर्षी दिव्यांग बांधवांसाठी आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात येते. या शिबीरात दिव्यांग बांधवांनी केलेल्या मागणीनुसार व्हील चेअर, श्रवणयंत्र, वॉकिंग स्टिक, ट्रायसायकल, टी.एल.एन. किट, बॅटरी ऑपरेटेड साहित्य आदी उपकरणे प्राप्त झाली आहेत.

या उपकरणांचे वाटप रविवार 14 सप्टेंबर रोजी सकाळी 10.00 वाजता विवेकानंद कॉलेजमधील शिक्षणमहर्षी बापुजी साळोखे सभागृह येथे करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले, पालकमंत्री प्रकाश आबीटकर तसेच जिल्ह्यातील खासदार व आमदारांच्या हस्ते दिव्यांग बांधवांना साहित्य प्रदान केले जाणार आहे.
साहित्याची मागणी नोंदविलेल्या कोल्हापूर शहरातील सर्व दिव्यांग बांधवांना या शिबीरात लाभ घेण्यासाठी शिबीरस्थळी येण्यासाठी महानगरपालिकेच्या चारही विभागीय कार्यालयातून सकाळी 8.00 वाजता के.एम.टी. बसेसची मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन महानगरपालिकेच्या प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी केले आहे.




