अहिल्यानगर आणि बीड जिल्ह्यात ढगफुटी सदृश पावसाने पूरस्थिती गंभीर
अहिल्यानगर - अहिल्यानगर जिल्ह्याच्या पूर्व भागात आणि बीड जिल्ह्याच्या पश्चिम भागात सोमवारी ढगफुटीसदृश मुसळधार पावसाने हाहाकार माजवला. यामुळे दोन्ही जिल्ह्यांतील नद्या दुथडी भरून वाहू लागल्या असून अनेक गावांत पुराचे पाणी शिरले आहे. पाथर्डी तालुक्यातील जगसून तांडा येथे एक व्यक्ती पुरात वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

पाथर्डी (अहिल्यानगर) आणि आष्टी (बीड) तालुके या संकटाचा सर्वाधिक फटका बसलेले भाग आहेत. आष्टी तालुक्यातील कडा गावात पूरस्थिती अत्यंत गंभीर बनल्याने लष्कराला पाचारण करण्यात आले आहे. लष्करी जवानांनी हेलिकॉप्टरच्या सहाय्याने बचाव कार्य सुरू केले आहे. जिल्ह्यात आपत्ती निवारण पथकही सक्रिय असून, काही ठिकाणी जेसीबीच्या मदतीने नागरिकांची सुटका करण्यात येत आहे. अनेकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात यश आले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून अनेक जनावरे वाहून गेली आहेत.
पाथर्डी तालुक्यातील करंजी, जवखेडे, तिसगाव आणि मढी परिसरात ढगफुटीसदृश पाऊस झाला. या भागातील अनेक गावांना पाण्याने वेढा घातल्याने संपर्क तुटला आहे. करंजी आणि जवखेडे या गावांतील 70 ते 80 नागरिक पुरात अडकले होते. स्थानिक ग्रामस्थ आणि आपत्ती निवारण पथकांनी त्यांची सुटका केली असून करंजीतील 16 नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले.
सध्या तहसीलदार उद्धव नाईक, पोलीस निरीक्षक विलास पुजारी, आणि अग्निशमन दलाचे पथक करंजी येथे बचाव कार्यात व्यस्त आहेत. गावातील प्रसिद्ध उत्तरेश्वर मंदिरालाही पुराचा वेढा बसला आहे. स्थानिकांनी सांगितले की इतका मोठा पूर याआधी कधीच पाहायला मिळाला नव्हता. नदीने आपले पात्र सोडून गावात प्रवेश केला आहे, त्यामुळे पक्क्या घरांत राहणारे लोकही अडकले आहेत.
अहिल्यानगर - जामखेड रस्त्यावरील सारोळाबद्धी परिसरातील पूल पुराच्या पाण्यामुळे वाहून गेला आहे. या रस्त्यावरचे काम सुरू असल्याने तात्पुरता पूल तयार करण्यात आला होता, पण तोही वाहून गेल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. चिचोंडी पाटील आणि आजूबाजूच्या गावांचा अहिल्यानगर शहराशी संपर्क तुटला आहे. याशिवाय नगर-जामखेड मार्गावरील कडा गावाजवळही पूल पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक बंद आहे.
बीड जिल्ह्यातील कडा गावात कडी नदीला मोठा पूर आल्याने गावात पाणी शिरले आहे. अनेक नागरिक इमारतींवर चढून मदतीसाठी आर्जव करत होते. यामुळे लष्कराची मदत घेण्यात आली आहे. आमदार सुरेश धस हे घटनास्थळी दाखल झाले असून लष्करी पथक हेलिकॉप्टरच्या मदतीने नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवत आहे. दुपारनंतर पावसाने उघडीप दिल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. परिणामी बचाव कार्याला वेग आला आहे आणि आपत्ती निवारण पथकांना काम करताना सोय झाली आहे.




