लाकडाच्या ओंडक्यासारखा दिसणारा भाग खरोखरच मगर निघाली अन् तरुणांनी...
शेंडूर (प्रतिनिधी) - काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर 'मगर हाय रे..' या वक्तव्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत होता. त्याची प्रचिती शेंडूर (ता.कागल) येथे खेकडे पकडावयास गेलेल्या दोन तरुणांना आली. ओढ्यामध्ये लाकडाच्या ओंडक्यासारखा दिसणारा भाग खरोखरच मगर निघाली आणि हे तरुण केवळ नशीब बलवत्तर म्हणून मगरीच्या हल्ल्यापासून बचावले.

याबाबत अधिक माहिती अशी की, शेंडूर येथील अवधूत सुतार व वैभव मेथे हे दोघेजण गावाच्या पूर्वेला असलेल्या तलावाकडील बाजूच्या ओढ्यामध्ये शनिवारी रात्री आठच्या सुमारास खेकडे पकडाव्यास गेले होते. रात्री अकरा वाजता त्यांनी पाहिजे होते तितके खेकडे पकडल्यानंतर थांबण्याचे ठरविले. याचवेळी त्यांना एक मोठा खेकडा दिसला. हा खेकडा पकडून माघारी परतायचे असा त्यांचा बेत होता. हा खेकडा मगरीच्या तोंडाजवळच होता. सुरुवातीला तरुणांना ही मगर लाकडाचा ओंडका वाटला, म्हणून अवधूतने खेकड्याच्या दिशेने पकडण्यासाठी हातही पुढे केला होता. इतक्यात मगरीने हालचाल केल्यामुळे दोघेही सावध झाले आणि अवधूतने हात मागे घेतला. मगर पाहून दोघांचेही धाबे दणाणले. त्यांनी तातडीने सर्पमित्रांना वनविभागाच्या अधिकाऱ्यांचा फोन नंबर उपलब्ध करण्यासाठी फोन केला. इतक्या रात्री वनविभाग येण्याची शक्यता कमी असल्यामुळे सर्पमित्र कृष्णात येलुगडे, पंडित मेढे,पोपट चव्हाण यांनी या ठिकाणी तातडीने धाव घेतली. दरम्यान मगर काँक्रीट बंधाऱ्याच्या खालील बाजूस असलेल्या पाण्यात सातत्याने जागा बदलत होती. सलग तीन तास तिच्या मागावर राहून सर्पमित्रांनी शिताफीने तिला जेरबंद केली. सकाळी वन विभागास याबाबत कल्पना देऊन त्यांच्या ताब्यात दिली. वनविभागाकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी ही मगर नेण्यात आली. जवळपास सात फुटांहून अधिक लांबीची पूर्ण वाढलेली ही मगर होती.
बघ्यांची गर्दी -
दरम्यान मगरीला वनविभागाच्या ताब्यात देताना त्या ठिकाणी बघण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केल्यामुळे बामणीकडील बाजूस कालव्याजवळ आणून वनविभागाच्या गाडीत ही मगर हलवण्यात आली. नदीपात्र व हा तलाव यामध्ये मोठे अंतर आहे. त्यामुळे या तलावात ही मगर आली कशी? अशी चर्चा नागरिकांत सुरू होती. कालव्याच्या पाण्यातून मगर आली असण्याचीही शक्यता काही नागरिकांनी व्यक्त केली. तसेच आणखी काही मगरींचा वावर तलावात असण्याच्या शक्यतेमुळे या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता असल्याचीही चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.




