कोल्हापुरातील छत्रपती शाहू महाराज टर्मिनसच्या ४३ कोटींच्या विकासकामांचा खा.धनंजय महाडिक यांनी घेतला आढावा

कोल्हापुरातील छत्रपती शाहू महाराज टर्मिनसच्या ४३ कोटींच्या विकासकामांचा खा.धनंजय महाडिक यांनी घेतला आढावा

कोल्हापूर (प्रतिनिधी): कोल्हापुरातील छत्रपती महाराज शाहू टर्मिनसवर सुरू असलेल्या ४३ कोटी रूपयांच्या विकासकामांचा आढावा घेत, खासदार धनंजय महाडिक यांनी रेल्वे अधिकार्‍यांना अनेक सुचना केल्या. तिकीट खिडकी, पार्कींग व्यवस्था, रिक्षा स्टॅण्ड, स्वच्छतागृह, वेटींग रूम, दिव्यांगांसाठी सुविधा, रेल्वे गाड्यांबद्दल माहिती देणारी स्क्रीन, प्लॅटफॉर्मची स्वच्छता, सरकते यांत्रीक जीने अशी सर्व कामे वेळेवर आणि दर्जेदार पध्दतीने पूर्ण व्हावीत, प्रवाशांना सर्वोत्तम सेवा सुविधा द्याव्यात, असे खासदार धनंजय महाडिक यांनी अधिकार्‍यांना बजावले. कोल्हापूर रेल्वे स्थानकावरून ७५ टक्के कामांची पुर्तता झाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. पण उर्वरीत काम गतीने पूर्ण करावे, असेही सांगितले.

कोल्हापुरातील छत्रपती शाहू महाराज टर्मिनसला १३५ वर्षे पूर्ण झाली आहेत. खासदार धनंजय महाडिक यांच्या पाठपुराव्यातून कोल्हापूर रेल्वे स्थानकाच्या विकासकामांसाठी ४३ कोटी रूपयांचा निधी मिळाला आहे. त्यातून गेल्या दीड वर्षात रेल्वे स्थानकावर अनेक कामे सुरू आहेत.

      स्वागत कक्ष, तिकीट खिडकी, दुचाकी आणि चारचाकी वाहनांचे पार्कींग, रिक्षा स्टॅण्ड, स्वच्छतागृह, वेटींग रूम, दिव्यांगांसाठी लिफ्ट आणि अन्य सुविधा, रेल्वे गाड्यांबद्दल माहिती देणारे डिस्प्ले, प्लॅटफॉर्मची स्वच्छता, प्रकाश योजना, यांत्रीक जिने अशा विविध कामांचा आढावा घेण्यासाठी, आज खासदार धनंजय महाडिक यांनी, रेल्वे स्थानकावर बैठक बोलावली होती. रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक हेमंतकुमार बहेरा, सहाय्यक अभियंता अरूणकुमार मिश्रा, सरोजकुमार, स्टेशन मास्तर आर. के. मेहता, विद्युत विभागातील सागर गायकवाड, रेल्वे पॅसेंजर समितीचे बाबा निंबाळकर, जयेश ओसवाल, मोहन शेटे, सहाय्यक पोलिस निरीक्षक आर. एम. पांडेय यांच्यासह वरिष्ठ अधिकार्‍यांची या बैठकीला उपस्थिती होती. कोल्हापूर रेल्वे स्थानकावरील सर्व कामांचा आढावा घेवून, प्रत्येक काम वेळेवर आणि दर्जेदार पध्दतीनं पूर्ण व्हावे, असे खासदार धनंजय महाडिक यांनी बजावले.

      रेल्वे स्टेशनवरील सर्व कामांची पाहणी करून, रेल्वे स्थानकात अतिक्रमण निर्माण होणार नाही, रेल्वे स्थानक परिसरात स्वच्छता असलीच पाहिजे, तसेच बेशिस्त रिक्षा व्यावसायिकांवर रेल्वे पोलिसांनी कारवाई करावी, असे खासदार महाडिक यांनी सांगितले. सुमारे तासभर सुरू असलेल्या या बैठकीत खासदार महाडिक यांनी प्रत्येक कामाची कितपत पुर्तता झाली आहे, हे तपासले. सरासरी ७० टक्के कामांची पुर्तता झाली असली तरी, कामांची पुर्तता वेगाने करावी, असेही खासदार महाडिक यांनी स्पष्ट केले.