देशभर मॉक ड्रिल; मॉक ड्रिल म्हणजे काय?

देशभर मॉक ड्रिल; मॉक ड्रिल म्हणजे काय?

India Vs Pakistan War Mock Drill: केंद्र सरकारने संपूर्ण देशात युद्धसज्जता तयार ठेवण्यासाठी आणि पाकिस्तानसोबत वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर मॉक ड्रिलचे आदेश दिले आहेत. जिल्हा प्रशासन आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा स्थानिक पातळीवर या ड्रिलची अंमलबजावणी करतील. विशेष म्हणजे, 1971 च्या युद्धानंतर देशात पहिल्यांदाच अशा स्वरूपाची मॉक ड्रिल केली जाणार आहे. त्यामुळे काही लोकांमध्ये चिंता आणि प्रश्न उपस्थित झाले आहेत की भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धाची शक्यता आहे का?

संरक्षण तज्ञ कर्नल अभय पटवर्धन यांनी यासंबंधी स्पष्टीकरण दिले. त्यांनी सांगितले की, गृह मंत्रालयाने पाच प्रमुख गोष्टींचा सराव करण्याचे निर्देश दिले आहेत. हवाई हल्ल्यासाठी सायरनचा उपयोग, रात्री ब्लॅकआऊटची तयारी, जखमींना त्वरित मदत, विद्यार्थी, नगरसेवक, एनसीसी छात्रांचा सहभाग, महत्त्वाच्या ठिकाणांचे संरक्षण आणि नागरिकांचे तातडीचे स्थलांतर.

मॉक ड्रिल म्हणजे काय?

मॉक ड्रिल म्हणजे युद्ध किंवा आपत्तीच्या परिस्थितीत प्रत्यक्ष घडण्याआधीच तयारीचा सराव. यात लोकांना सावध करणे, यंत्रणा तपासणे, आणि आपत्कालीन प्रतिसादाची चाचणी घेणे याचा समावेश असतो.

कर्नल पटवर्धन यांनी स्पष्ट केले की, 1984 मध्ये अमृतसरमध्ये अशा प्रकारचा सराव झाला होता, पण यावेळचा उपक्रम अधिक व्यापक आहे. सीमावर्ती राज्यांमध्ये ही मॉक ड्रिल अत्यावश्यक असून, आजच्या काळात हल्ल्याचा धोका कुठेही असू शकतो. नागरिकांनी आपली सुरक्षितता कशी राखावी, याचे शिक्षण देणेही या सरावाचा उद्देश आहे.

काही नागरिकांमध्ये भीती निर्माण होण्याची शक्यता आहे, म्हणून सरकारने लोकांना स्पष्टपणे सांगावे की ही तयारी त्यांच्या सुरक्षेसाठी आहे, असेही पटवर्धन यांनी नमूद केले. अन्यथा, उलट परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.