सीबीएस परिसरात उघड्यावर कचरा टाकणाऱ्या 34 खाद्य विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई

कोल्हापूर (प्रतिनिधी) - सीबीएस परिसरातील विक्रेत्यांना उघड्यावर कचरा न टाकणेबाबत वारंवार महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने कळविण्यात आले होते. सकाळ सत्रात घंटागाडी व रात्रीच्या डंपरची व्यवस्था करुन देखील काही विक्रेते हे आपल्या हातगाडीवरील कचरा त्याच ठिकाणी उघड्यावर टाकत असल्याचे महानगरपालिकेच्या निदर्शनास आले. त्यामुळे महानगरपालिका आरोग्य विभागाच्या पथकामार्फत अशा 34 खाद्य विक्रेत्यांवर कारवाई करुन रु 8,200/- चा दंड वसूल करण्यात आला.
ही कारवाई सहा.आयुक्त कृष्णा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, मुख्य आरोग्य निरिक्षक डॉ.विजय पाटील यांच्या आदेशाने तसेच विभागीय आरोग्य निरिक्षक विकास भोसले, आरोग्य निरीक्षक महेश भोसले, विनोद नाईक, नंदकुमार मौर्य, मुकादम व कर्मचारी यांनी केली.
तरी शहरातील सर्व विक्रेत्यांनी आपला दैनंदिन कचरा कोल्हापूर महानगरपालिकेने अधिकृत केलेल्या (घंटा गाडी) वाहनांकडेच द्यायचा आहे. अन्यथा हा कचरा इतरत्र उघड्यावर, नाल्यामध्ये टाकल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित आस्थापनेवर नियंत्रण अधिनियम 1998 मधील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल याची संबंधीतांनी नोंद घ्यावी असे आवाहन आरोग्य घनकचरा विभागामार्फत करण्यात आले आहे.