गणपतीसाठी निघालेले शिक्षक कुटुंब झाले बेपत्ता ; समोर आला मोठा ट्विस्ट

गणपतीसाठी निघालेले शिक्षक कुटुंब झाले बेपत्ता ; समोर आला मोठा ट्विस्ट

रत्नागिरी - रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर येथे शिक्षक म्हणून कार्यरत असलेले ज्ञानेश्वर काळूराम चव्हाण हे आपल्या पत्नी आणि दोन मुलांसह गणेशोत्सवासाठी मूळ गावी हिंगोलीकडे निघाले असताना बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल झाल्याने खळबळ उडाली होती.

मंगळवारी (२६ ऑगस्ट) दुपारी त्यांनी गुहागरमधील घराला कुलूप लावून, शेजारी शशिकला विश्वकर्मा यांच्याकडे चावी दिली व चारचाकीतून निघाले होते. संध्याकाळी ५.१६ वाजता त्यांची चारचाकी कुंभार्ली घाटमाथा परिसरातील सीसीटीव्हीत दिसली, मात्र त्यानंतर त्यांचा काहीही संपर्क झाला नाही. मोबाईल फोनही बंद येत असल्याने नातेवाईक आणि मित्र मंडळींमध्ये चिंतेचं वातावरण होतं.

शोधासाठी पोलिस यंत्रणाही युद्धपातळीवर कामाला लागली. सातारा, पंढरपूर आणि परिसरातील पोलिसांनाही माहिती देण्यात आली होती. अखेर आज गुरुवारी (२८ ऑगस्ट) गुहागर पोलिसांना माहिती मिळाली की, चव्हाण कुटुंब गोंदवले येथील महाराजांच्या मठात असून सर्वजण सुखरूप आहेत. त्यांच्या गाडीचा शोध लागल्यावर त्यांच्याशी संपर्क साधण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चव्हाण कुटुंबाने गोंदवले मठात दोन दिवस राहण्याचा निर्णय घेतला होता, मात्र त्यांनी याची कल्पना कोणालाही दिली नव्हती. त्यामुळेच त्यांच्या बेपत्ता होण्याची तक्रार गुहागर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. या घटनेमुळे अनावश्यक गोंधळ निर्माण झाला असला तरी कुटुंब सुरक्षित असल्याची खात्री मिळाल्याने नातेवाईक आणि मित्रांनी सुटकेचा नि: श्वास सोडला आहे.