साईनगर मठूरे कॉलनीतील प्रलंबित प्रॉपर्टी कार्ड प्रश्न मार्गी लागल्याचे समाधान - राजे समरजितसिंह घाटगे
कागल (प्रतिनिधी) - कागल नगरपालिकेच्या निवडणुकीत आमच्या युतीची सत्ता आल्यानंतर साईनगर मठूरे कॉलनीतील प्रलंबित प्रॉपर्टी कार्डचा प्रश्न सोडवणे हे पहिलेच महत्त्वाचे काम करता आले, याचे समाधान आहे. वर्षानुवर्षे नागरिकांच्या नावावर नसलेल्या जागा आता त्यांच्या मालकीच्या झाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद पाहून समाधान वाटते, असे प्रतिपादन शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष राजे समरजीतसिंह घाटगे यांनी केले.कागलमधील साईनगर, मठूरे कॉलनी येथील ५५ घरांचे स्वमालकीची प्रॉपर्टी कार्ड वितरण समारंभात ते बोलत होते.

राजे समरजितसिंह घाटगे पुढे म्हणाले, प्रॉपर्टी कार्ड नसल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत होती. यासाठी मंत्री मुश्रीफ आणि मी सातत्याने प्रयत्नशील होतो. आता आम्ही दोघे एकत्र आल्यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हा प्रश्न मार्गी लागला आहे. अजूनही काही कॉलनींमध्ये असे प्रश्न आहेत. हा विषय जरी किचकट असला तरी शासन पातळीवर प्रयत्न करून तो सोडविणार आहोत.
गोकुळचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ म्हणाले, प्रॉपर्टी कार्डचा प्रलंबित प्रश्न मंत्री मुश्रीफ व राजे समरजितसिंह घाटगे यांच्या पुढाकारामुळे मार्गी लागला आहे.ते नागरिकांचे इतरही प्रश्न निश्चित सोडवतील.
जिल्हा बँकेचे संचालक प्रताप माने,माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर,नगरसेवक अरुण गुरव,डॉ. सौरभ तुपकर यांनीही मनोगत व्यक्त केले. स्वागत मुकेश मठूरे यांनी केले.
कार्यक्रमास नगराध्यक्षा सविता माने, उपनगराध्यक्ष जयवंत रावण, सर्व नगरसेवक-नगरसेविका यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.




