सोन्याचा भाव 1 लाखाच्या पार , आर्थिक अस्थिरतेचा थेट परिणाम

सोन्याचा भाव 1 लाखाच्या पार , आर्थिक अस्थिरतेचा थेट परिणाम

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमतींमध्ये सतत वाढ होत असून, आता तो ऐतिहासिक टप्प्यावर पोहोचला  आहे. 22 एप्रिल 2025 रोजी, सोन्याने किरकोळ बाजारात 1 लाख रुपयांचा टप्पा ओलांडला, तर MCX वरील जून वायदा दर प्रति 10 ग्रॅम 99,178 रुपये इतक्या उच्चांकावर पोहोचला, जो मागील दिवशीच्या तुलनेत 1,900 रुपयांनी जास्त आहे.

या वाढीमागे कमकुवत डॉलर, अमेरिका-चीन टॅरिफ वॉर, शेअर बाजारातील अस्थिरता आणि व्याजदर कपातीच्या अपेक्षा यांचा मोठा वाटा आहे. गुंतवणूकदार आता शेअर बाजाराऐवजी सोने आणि चांदीसारख्या सुरक्षित पर्यायांकडे वळत आहेत.

सोमवारी, जीएसटीशिवाय सोन्याचा भाव 97,200 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका होता. 3% जीएसटी जोडल्यावर हा दर 1 लाख रुपयांच्या पुढे गेला. चांदीच्या किमतीतही वाढ झाली असून, मे वायदा दर 0.33% ने वाढून 95,562 रुपये/किलो झाला आहे.

या आर्थिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर, सोनं आणि चांदी हे गुंतवणुकीसाठी आकर्षक पर्याय ठरत आहेत. यावर्षी सोन्याच्या किमतीत आतापर्यंत 25% पेक्षा जास्त वाढ झाली असून, फेडचे व्याजदर कमी होणार की नाही यावर सध्या जगभरातील बाजाराची नजर आहे. डॉलर निर्देशांक तीन वर्षांतील सर्वात नीचांकी पातळीवर आल्यामुळेही सोन्याच्या किमतीला जोरदार चाल मिळाल्याचं स्पष्ट होतं.