कोल्हापूरातून पुण्यात उतरल्या अन् रिक्षाची वाट बघत असतानाच अचानक नाल्यात...

Pune News - वडगाव बुद्रुक येथील नवले पूल परिसरात गुरुवारी रात्री एक दुर्दैवी घटना घडली. पावसामुळे रस्त्यावर साचलेल्या पाण्याचा अंदाज न आल्याने एक महिला नाल्यात पडून वाहून गेली. ही घटना रात्री ११ ते १२ च्या दरम्यान घडली. घटनास्थळी अग्निशमन दलाने तात्काळ धाव घेतली आणि शोधमोहीम सुरू केली.
मृत महिलेचे नाव शोभा मनोहर महिमाने (वय ५७) असून त्या मूळच्या बार्शी येथील असून सध्या फुरसुंगी, दर्शन पार्क येथे वास्तव्यास होत्या. त्या कोल्हापूरहून पुण्यात आल्या होत्या आणि नवले पुलाजवळ उतरून फुरसुंगीला जाण्यासाठी रिक्षा शोधत होत्या.
रस्त्याच्या कडेला असलेल्या नाल्यात पाणी साचलेले होते आणि तेथील पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने त्या अचानक नाल्यात पडल्या आणि वाहून गेल्या. त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या एका कारचालकासह इतर दोन लोकांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाण्याचा वेग खूप जास्त असल्याने ते शक्य झाले नाही.
कात्रज, सनसिटी आणि नवले पूल या अग्निशमन दलाच्या तीन विभागांनी शोधकार्य सुरू केले. शुक्रवारी दिवसभर शोध मोहीम सुरू होती. सायंकाळी सातच्या सुमारास वारजे स्मशानभूमीजवळ मुठा नदीपात्रात त्यांचा मृतदेह आढळून आला. याआधी, वडगाव पुलाजवळ त्यांच्या साडीचा तुकडा आणि पादत्राणे सापडले होते.