वाहतूक नियम तोडणाऱ्यांना मोठा दणका ; वर्षात पाच वेळा उल्लंघन केल्यास होणार लायसन्स रद्द

वाहतूक नियम तोडणाऱ्यांना मोठा दणका ; वर्षात पाच वेळा उल्लंघन केल्यास होणार लायसन्स रद्द

नवी दिल्ली - आता सिग्नल तोडणे किंवा वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवणे वाहनचालकांना चांगलेच महागात पडणार आहे. एका वर्षात पाच वेळा किंवा त्याहून अधिक वेळा वाहतुकीचे नियम मोडल्यास चालकाचा परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) तीन महिन्यांसाठी रद्द केला जाऊ शकतो. दळणवळण मंत्रालयाने लागू केलेल्या नवीन मोटार वाहन सुधारणा नियमांत ही तरतूद करण्यात आली आहे.

या नियमांनुसार चालकाचा परवाना रद्द करण्याचा अधिकार आरटीओ किंवा जिल्हा परिवहन कार्यालयाला देण्यात आला आहे. मात्र परवाना रद्द करण्यापूर्वी संबंधित चालकाची बाजू ऐकून घेणे अधिकाऱ्यांना बंधनकारक असणार आहे. या नव्या नियमांचे नोटिफिकेशन बुधवारी जारी करण्यात आले असून, पाच किंवा अधिक वाहतूक नियमांचे उल्लंघन झाल्यास परवाना रद्द करण्याची अंमलबजावणी १ जानेवारीपासून लागू झाली आहे.

नोटिफिकेशनमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे की, एका वर्षापूर्वी केलेले वाहतूक उल्लंघन पुढील वर्षासाठी ग्राह्य धरले जाणार नाही. सध्या एकूण २४ गंभीर नियम आहेत, ज्यांच्या उल्लंघनावर अधिकाऱ्यांना चालकाचा परवाना रद्द करता येतो. यामध्ये वाहन चोरी, प्रवाशावर हल्ला, प्रवाशाचे अपहरण, वेगमर्यादा ओलांडणे, वाहनात क्षमतेपेक्षा अधिक माल भरणे तसेच सार्वजनिक ठिकाणी वाहन बेवारस सोडणे यांचा समावेश आहे.

नव्या तरतुदीनुसार आता पाच उल्लंघनांमध्ये हेल्मेट न घालणे, सीट बेल्ट न लावणे, सिग्नल तोडणे यांसारख्या तुलनेने किरकोळ वाटणाऱ्या गुन्ह्यांचाही समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे हे नियम वारंवार मोडल्यास चालकाचा परवाना रद्द होण्याचा धोका वाढला आहे.

दिल्लीचे माजी सह - वाहतूक संचालक अनिल चिक्का म्हणाले, वर्षात पाच वेळा वाहतूक नियम मोडल्यावर परवाना रद्द करण्याची तरतूद योग्य दिशेने टाकलेले पाऊल आहे. मात्र अनेकदा लोक धोकादायक पद्धतीने वाहन चालवतात, पण ते ट्रॅफिक पोलिसांच्या निदर्शनास येत नाही. यासाठी स्पष्ट एसओपीचा अभाव आहे. तसेच सीसीटीव्हीमध्ये नोंद झालेल्या वाहतूक उल्लंघनांवर अनेकदा न्यायालयात आव्हान दिले जाते, असेही त्यांनी नमूद केले.