पतंगाने घेतला एकाचा जीव
कोल्हापूर (प्रतिनिधी) - विद्युत तारेत अडकलेला पतंग काढताना दोन सख्ख्या भावांना विजेचा धक्का बसला. बुधवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास उचगाव येथे १५ वर्षीय सार्थक निलेश वळकुंजे या बालकाचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू झाला. मंगेश्वर देवालयाच्या मागे पतंग तारेवर अडकला होता. तो काढण्यासाठी गेला असता सार्थकचा विद्युत तार वाहिनीला स्पर्श झाला आणि क्षणातच त्याला विजेचा जबर धक्का बसला. या भीषण अपघातात सार्थकचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

सार्थकचा लहान भाऊ विनायक निलेश वळकुंजे हा सुदैवाने वाचला असून त्याच्यावर खाजगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. घटनेनंतर संपूर्ण उंचगाव परिसरातील वीजपुरवठा तात्काळ खंडित करण्यात आला होता. उचगांव मधील ही घटना समजताच घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली होती.
घटनेची माहिती मिळताच गांधीनगर पोलीस व सी.पी.आर. पोलिस चौकीचे कर्मचारी घटनेचा पंचनामा करून घटनेची नोंद घेतली. या घटनेने उंचगाव व परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहेत. नागरिकांनी, मुलांनी पतंग उडविताना विद्युत तारेपासून सुरक्षित अंतरावर पंतग उडवावे आणि काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.




