पलाश मुच्छल यांच्या आगामी चित्रपटात श्रेयस तळपदे ; सोशल मीडियावर नावांवरून चर्चा
मुंबई - दिग्दर्शक पलाश मुच्छल यांच्या आगामी चित्रपटात अभिनेता श्रेयस तळपदे मुख्य भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटात श्रेयस एका सामान्य माणसाची भूमिका साकारणार असून, चित्रपटाचे नाव अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. मात्र, लवकरच या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होण्याची शक्यता आहे. चित्रपटाच्या घोषणेनंतर सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले असून, काही वापरकर्त्यांनी दिग्दर्शकावर टीका करत चित्रपटासाठी विचित्र आणि उपरोधिक नावे सुचवली आहेत.

चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी ही माहिती त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केली. पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की, “पलाश मुच्छल यांच्या पुढील चित्रपटात श्रेयस तळपदे मुख्य भूमिका साकारणार आहेत. हा चित्रपट मुंबईत सेट केला जाणार असून, श्रेयस एका सामान्य माणसाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या घोषणेमुळे चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.
घोषणेनंतर सोशल मीडियावर काही वापरकर्त्यांनी विनोदी प्रतिक्रिया दिल्या. एका वापरकर्त्याने लिहिले, या चित्रपटाची कथा प्रियकर किंवा पतीकडून होणाऱ्या फसवणुकीवर आधारित असावी. तर दुसऱ्याने उपहासात्मकपणे चित्रपटाचे नाव महिला को धोखा कैसे दे असे सुचवले. आणखी एका वापरकर्त्याने, यावर अ नाईट बिफोर द वेडिंग नावाची वेब सिरीज बनवा, ती सर्व रेकॉर्ड मोडेल,अशी टिप्पणी केली. काहींनी तर चित्रपटाचे नाव सनम बेवफा असावे, असेही म्हटले. अशा विविध प्रतिक्रिया देत अनेकांनी चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच दिग्दर्शकावर टीका सुरू केली आहे.
श्रेयस तळपदे गेल्या काही वर्षांपासून त्यांच्या दमदार अभिनयामुळे चर्चेत आहेत. त्यांनी गोली मार के ले लो, कट्टी बट्टी, तारीख, पुणेरी मिसळ आणि इमर्जन्सी यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. विनोद आणि गंभीर अभिनय या दोन्ही प्रकारांत त्यांचे प्रभुत्व असल्याने ते प्रेक्षकांमध्ये विशेष लोकप्रिय आहेत. आता पलाश मुच्छल यांच्यासोबतचा हा नवा प्रकल्प श्रेयसला वेगळ्या अंदाजात सादर करणार असल्याने चाहते त्याच्या भूमिकेकडे उत्सुकतेने पाहत आहेत.
पलाश मुच्छल हे गायक, संगीतकार आणि दिग्दर्शक म्हणून ओळखले जातात. त्यांनी भूतनाथ रिटर्न्स सारख्या चित्रपटांना संगीत दिले असून, अनेक लोकप्रिय गाणीही लिहिली आहेत. दिग्दर्शक म्हणून त्यांनी अर्ध (२०२२) आणि काम चालू है (२०२४) हे चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. त्यांच्या चित्रपटांमध्ये दैनंदिन जीवन, मानवी नातेसंबंध आणि सामाजिक विषयांवर भर दिला जातो. आता मुंबईसारख्या वेगवान, स्वप्नांनी आणि संघर्षांनी भरलेल्या शहरात आधारित हा आगामी चित्रपट प्रेक्षकांसाठी एक वेगळा अनुभव देईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.




