सय्यद मुश्ताक अली टी - 20 साठी मुंबईचा संघ जाहीर ; 'या' खेळाडूवर कर्णधारपदाची जबाबदारी
मुंबई - सय्यद मुश्ताक अली टी - 20 ट्रॉफीसाठी मुंबईने आपला दमदार संघ जाहीर केला आहे. रोहित शर्माचा विश्वासू खेळाडू शार्दूल ठाकूरला कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली असून सूर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि सरफराज खान यांसारखे अनुभवी स्टार्स संघात आहेत. मागील वर्षी श्रेयस अय्यरच्या नेतृत्त्वाखाली मुंबईने विजेतेपद पटकावले होते. परंतु यंदा अय्यर दुखापतीमुळे बाहेर असल्याने संघात काही बदल झाले आहेत. मात्र अनुभवी अजिंक्य रहाणेला यावेळी संघात स्थान देण्यात आले आहे.

विकेटकीपर म्हणून अंगकृष रघुवंशी आणि हार्दिक तमोर या दोघांवर विश्वास ठेवण्यात आला आहे. गोलंदाजी विभागात तुषार देशपांडे आणि तनुष कोटियन हे महत्त्वाची जबाबदारी सांभाळणार आहेत. रणजी ट्रॉफीत पाच सामन्यांत तीन शतके झळकवत 530 धावा करणाऱ्या सिद्धेश लाडलाही या संघात स्थान मिळाले असून टी - 20 मध्येही त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.
टी - 20 संघाचा भारतीय कर्णधार झाल्यानंतर सूर्यकुमार यादव फॉर्ममध्ये फारसा दिसला नाही. त्यामुळे आगामी स्पर्धा त्याच्यासाठी ‘कमबॅक’ करण्याची मोठी संधी मानली जात आहे.
26 नोव्हेंबरपासून स्पर्धेला सुरुवात -
सय्यद मुश्ताक अली टी - 20 ट्रॉफीचा एलीट ग्रुप 26 नोव्हेंबर ते 18 डिसेंबर दरम्यान रंगणार आहे. पहिल्या टप्प्याचे सामने लखनऊ, हैदराबाद, अहमदाबाद आणि कोलकाता येथे होतील, तर नॉकआउट फेरी इंदूरमध्ये खेळवली जाणार आहे. मुंबईचा पहिला सामना 26 नोव्हेंबर रोजी लखनऊ येथे रेल्वेविरुद्ध होणार आहे. अनुभवी खेळाडू आणि तरुण प्रतिभेचा उत्तम मेळ असलेला मुंबईचा संघ पुन्हा विजेतेपदावर निशाणा साधण्यासाठी सज्ज आहे.
मुंबईचा संपूर्ण संघ -
शार्दुल ठाकूर (कर्णधार), हार्दिक तामोरे (यष्टीरक्षक), अंगकृष्ण रघुवंशी (यष्टीरक्षक), अजिंक्य रहाणे, आयुष म्हात्रे, सूर्यकुमार यादव, सर्फराज खान, सिद्धेश लाड, शिवम दुबे, साईराज पाटील, मुशीर खान, सूर्यांश शेडगे, अथर्व अंकोलेकर, तनुष कोटियन, शम्स मुलाणी, तुषार देशपांडे, इरफान उमैर.




