कोल्हापूर जिल्ह्यातील 'इतक्या' रेशन धारकाचं रेशन होणार बंद

कोल्हापूर (प्रतिनिधी) - कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या सलग सहा महिन्यांपासून रेशनवरील धान्य न उचलणाऱ्या 20,310 लाभार्थ्यांचे रेशन बंद होणार आहे. त्यांच्या ऐवजी प्राधान्य योजनेच्या प्रतीक्षा यादीतील पात्र लाभार्थ्यांना हे धान्य देण्यात येणार आहे. यापूर्वी संबंधितांची पुन्हा एकदा पडताळणी केली जाईल.
राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून अंत्योदय कार्डधारकांना दरमहा 35 किलो आणि प्राधान्य योजनेतील सदस्यांना प्रति सदस्य 5 किलो मोफत धान्य दिले जाते. केशरी कार्डधारकांपैकी सुमारे 76% लोकांना प्राधान्य योजनेचा लाभ मिळतो. शहरी भागासाठी वार्षिक उत्पन्न मर्यादा 59,000 रुपये आणि ग्रामीण भागासाठी 44,000 रुपये आहे.
राज्य सरकारने दिलेल्या आदेशानुसार, रेशन न घेणाऱ्या आणि योजनेचा लाभ न घेणाऱ्या कार्डधारकांचे धान्य बंद करून ते प्रतीक्षा यादीतील पात्र नागरिकांना द्यावे, असे ठरवण्यात आले. यानुसार, जिल्हा पुरवठा विभागाने ई-पॉस मशीनवरील वितरण माहितीच्या आधारे 9,246 रेशन कार्डधारकांचे, म्हणजेच 20,310 व्यक्तींची यादी तयार केली आहे. त्यांची लवकरच खातरजमा केली जाईल आणि खात्री झाल्यानंतर रेशन वितरण थांबवले जाईल. हेच धान्य प्रतीक्षा यादीतील लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे, त्यामुळे कोटा वाढवण्याची गरज न पडता गरजूंना मदत मिळेल.
दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यात 3,88,314 लाभार्थ्यांची ई-केवायसी अद्यापही पूर्ण झालेली नाही. तीन वेळा मुदतवाढ दिल्यानंतरही हे काम रखडलेले आहे. एकूण 21,33,211 नागरिकांची ई - केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. ई - केवायसीसाठी पुन्हा मुदतवाढ द्यावी, अशी मागणी होत आहे, मात्र अद्याप निर्णय झालेला नाही.