'या' मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील - मंत्री हसन मुश्रीफ

'या' मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील - मंत्री हसन मुश्रीफ

उत्तूर (प्रतिनिधी) - उत्तूर जिल्हा परिषद  मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शिरीष देसाई व भादवन पंचायत समिती मतदार संघाच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार जयश्री गाडे मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला. उत्तूर जिल्हा परिषद मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे ऊमेदवार शिरीष देसाई व भादवन पंचायत समिती मतदार संघाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार जयश्री संजय गाडे यांच्या प्रचारार्थ मंत्री मुश्रीफ बोलत होते. गजरगांव, हारूर, कानोली, निंगुडगे, कोवाडे, दाबेवाडी या गावांमध्ये मंत्री मुश्रीफ यांच्या प्रचारसभा झाल्या. या प्रचारसभांना मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळाला.

            

मंत्री मुश्रीफ पुढे म्हणाले, हा भाग नव्यानेच उत्तूर जिल्हा परिषद मतदार संघामध्ये समाविष्ट झालेला आहे. हा भाग कागल, गडहिंग्लज, उत्तूर विधानसभा मतदारसंघांमध्येही समाविष्ट व्हावा, अशी माझी प्रार्थना आहे. गोरगरिबांचे कल्याण आणि विशेषता माता-भगिनींचे सक्षमीकरण यासाठी सातत्यपूर्वक प्रयत्न करीत आलो आहोत. या परिसरात राजकीय सत्तेच्या माध्यमातून विकासकामे तर होतच राहतील. तसेच; गोरगरिबांच्या विशेषता सर्वसामान्य माणसांच्या पेन्शन योजना, आरोग्यसेवा, बांधकाम कामगार कल्याण, बेघरांना घरकुले यासारख्या सामाजिक कल्याणकारी योजना राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य घरादारापर्यंत पोहोचवतील, असेही ते म्हणाले.

उत्तुर जिल्हा परिषद मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शिरीष देसाई म्हणाले, नामदार हसन मुश्रीफ हे जनतेसाठी अहोरात्र राबणारे नेते आहेत. त्यांच्या पावलावर पाऊल टाकत उत्तुर जिल्हा परिषद मतदार संघाचा कायापालट करू. विकास कामांबरोबरच गोरगरिबांच्या कल्याणाच्या योजना जनतेच्या घरा-दारापर्यंत पोहोचवू.

भादवन पंचायत समितीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार जयश्री संजय गाडे म्हणाल्या, नामदार हसन आणि माता भगिनींचे ऋणानुबंध घट्ट आहेत. मीही पंचायत समितीच्या सत्तेच्या माध्यमातून खेड्या -पाड्यातील माता - भगिनींच्या सबलीकरणासाठी अहोरात्र काम करीन.

उमेश आपटेंवर महात्मा गांधीजींचा प्रभाव की आणखी काय ....?

मंत्री मुश्रीफ म्हणाले, उत्तुर जिल्हा परिषद मतदार संघातील विरोधी उमेदवार उमेश आपटे यांचे मला तर आश्चर्यच वाटते. ते काँग्रेसमध्ये होते आणि आमदार सतेज उर्फ बंटी पाटील त्यांचे नेते होते. त्यांनीच आपटे यांना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष केले होते. भाजपची लाट आली आहे समजून ते त्या पक्षात गेले असते तर मी समजू शकलो असतो. परंतु; त्यांनी ताराराणी आघाडीच का निवडली? याचे मला कोडे सुटलेले नाही. त्यांच्यावर महात्मा गांधींचा प्रभाव पडला की आणखी काय झालं? याबाबत माझे संशोधन सुरूच आहे. त्यांनाही याचे उत्तर द्यावेच लागेल.

यावेळी केडीसीसी बँकेचे संचालक व पेरणोली जिल्हा परिषद मतदार संघाचे उमेदवार सुधीर देसाई, उत्तुर जिल्हा परिषद मतदार संघाचे उमेदवार शिरीष देसाई, भादवन पंचायत समितीच्या उमेदवार जयश्री गाडे, आजरा साखर कारखान्याचे माजी चेअरमन वसंतराव धुरे, आनंदराव घाटगे, काशिनाथ तेली, एम. के. देसाई, दिपकराव देसाई, राजेंद्र मुरकुटे, अल्बर्ट डिसोजा, मारुतराव घोरपडे, आजरा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अनिल फडके, संजय येजरे, बी. टी. जाधव, सुधीर सावंत आदी प्रमुख उपस्थित होते.