संवेदनशीलता जपणे हाच खरा मानवधर्म - नाम.चंद्रकांत पाटील

कोल्हापूर (प्रतिनिधी) - महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकारातून कोल्हापूर शहरात विविध लोककल्याणकारी उपक्रम राबवले जातात. या उपक्रमांतर्गत छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांसाठी 50% सवलतीच्या दरात रोजच्या वापराच्या विविध वस्तू उपलब्ध करून दिल्या जातात. या विक्री केंद्रासाठीच्या नव्या सुसज्ज गाडीचा लोकार्पण सोहळा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला. संवेदनशीलता जपणे हाच खरा मानवधर्म असे प्रतिपादन नाम.चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केले.
नाम. चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले, संवेदनशीलता केवळ उक्तीतून नव्हे तर कृतीतून दाखवली पाहिजे. ज्या समाजात आपण जन्म घेतला त्या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या भावनेतून प्रत्येकाने कार्य केले पाहिजे. छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात उपचार घेणारे बहुतांश रुग्ण हे गोरगरीब आणि सर्वसामान्य कुटुंबातील असतात. त्यांच्यासोबत आलेले नातेवाईक प्रसंगी फुटपाथवर झोपतात.अशा नातेवाईकांची गैरसोय होऊ नये म्हणून त्यांना 50% सवलतीच्या दरात दैनंदिन वापराच्या वस्तू दिल्या जातात. यामध्ये टूथपेस्ट, टूथब्रश, साबण, डायपर्स, सॅनिटरी पॅड अशा वस्तूंचा समावेश आहे. दवाखान्याचा खर्च भागवताना मेटाकुटीला आलेल्या रुग्णाच्या नातेवाईकांना हे वस्तू विक्री केंद्र मोठा आधार ठरत आहे.
आजपर्यंत हजारो रुग्णांच्या नातेवाईकांनी या केंद्राचा लाभ घेतला आहे. या केंद्राची व्याप्ती वाढवण्याच्या हेतूने हे नवीन सुसज्ज वाहन लोकसेवेसाठी दाखल होत असल्याचे उद्गार नाम. चंद्रकांत पाटील यांनी काढले. समाजसेवेच्या हेतूने आपण केलेली छोटीशी कृतीही मोठा बदल घडवू शकते. सुरुवात स्वतः पासून केली पाहिजे असे सांगत समाजातील वंचितांच्या हितासाठी यापुढेही असेच उपक्रम राबवण्याचा मानस नाम. पाटील यांनी व्यक्त केला.
यावेळी अंजली पाटील, भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव, महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव, ग्रामीण जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, वस्ती विकास प्रकल्पाचे समन्वयक अभयकुमार वंटे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी,माजी नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य आणि कार्यकर्ते उपस्थित होते.