कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकरनं इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करुन दिली गुडन्यूज
मुंबई (प्रतिनिधी) : आपल्या हक्काचं स्वप्नातलं घर असावं, ही प्रत्येकाचीच इच्छा असते. अनेकजण पै पै साठवून आपसं स्वप्न पूर्ण करतात. सर्वसामान्यांप्रमाणेच अनेक सेलिब्रिटी आहेत, ज्यांचं मुंबईत हक्काचं घर घेण्याचं स्वप्न असतं. अनेकांनी ते स्वप्न पूर्णही केलंय. अशातच आता गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर एका सेलिब्रिटी कपलनं आपल्या स्वप्नातलं घर घेतलं आहे.

प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकरनं इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करुन गुडन्यूज दिली आहे. अंकिता वालावलकर आणि तिचा पती संगीतकार कुणाल भगत यांनी आपल्या हक्काचं घर घेतलं आहे. सोशल मीडियावर घराचे फोटो शेअर करुन अंकिता आणि कुणालनं ही गूड न्यूज चाहत्यांना दिली आहे. पण, त्याहीपेक्षा अंकितानं लिहिलेल्या कॅप्शननं सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
अंकिता वालावलकरनं पोस्ट शेअर करताना एक कॅप्शन लिहिलंय, ती म्हणालीय की, "घर घेणं… हे फक्त स्वप्न नव्हतं, ती माझी जिद्द होती. मुंबईत आले तेव्हा सिव्हिल इंजिनियर म्हणून इतरांची घरं बांधत होते…पण मनात एकच विचार “माझं घर कधी?”मी कुठेतरी वाचलं होतं स्वप्नं नेहमी आपल्या लायकीपेक्षा मोठी बघायची.कारण लायकी आपण वाढवू शकतो…"
"पण छोटं स्वप्न मोठं होत नाही.मला फॉलो करणाऱ्यांना माहिती असेल.मी कित्येकदा पेडर रोडवरून फेऱ्या मारायचे.अंबानींच्या अन्टेलिया (antilia) समोर उभी राहायचे.त्या उंच इमारतीकडे बघायचे,आणि स्टोरी टाकायचे "एक दिन मेरा भी घर होगा.”लोकांसाठी ती फक्त एक स्टोरी होती. पण माझ्यासाठी ती प्रार्थना होती. विश्वाला केलेली एक शांत हाक होती.आज विचार केला तर अंगावर शहारे येतात. आणि योगायोग बघा आज ज्या टॉवरमध्ये आमचं घर आहे, त्या टॉवरचं नाव आहे "Antilia" हा योगायोग आहे? की स्वामींची इच्छा?",असं अंकिता वालावलकर म्हणाली आहे.




