ग्रामीण भागातील रोजगार निर्मितीसाठी ‘शरद’ सूतगिरणीसारखे उद्योग आवश्यक - पालकमंत्री प्रकाश आबिटकर

ग्रामीण भागातील रोजगार निर्मितीसाठी ‘शरद’ सूतगिरणीसारखे उद्योग आवश्यक - पालकमंत्री प्रकाश आबिटकर

कोल्हापूर (प्रतिनिधी) - ग्रामीण भागातील बेरोजगारी कमी करायची असेल, तर ‘शरद’ सूतगिरणीसारखे उद्योग उभारणे गरजेचे आहे. ही सूतगिरणी केवळ एक उद्योग नाही, तर सहकाराच्या बळावर शेतकरी आणि युवकांसाठी नव्या भविष्याची दिशा दाखवणारी वाटचाल आहे," असे प्रतिपादन पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले. ते आकुर्डे (ता. भुदरगड) येथे आयोजित ‘शरद सहकारी सूतगिरणी’ औद्योगिक प्रकल्पाच्या सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सूतगिरणीचे अध्यक्ष बी. एस. देसाई यांनी भूषवले.

यावेळी बोलताना पालकमंत्री आबिटकर म्हणाले की, ‘शरद’ सूतगिरणी हे केवळ उत्पादनाचे केंद्र नसून ग्रामीण भागात रोजगार निर्मितीचे प्रभावी माध्यम ठरणार आहे. अशा सहकारी संस्थांच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्था अधिक सक्षम करण्याचा शासनाचा संकल्प असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमात भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील आणि शिवसेना शेतकरी सेना प्रदेशाध्यक्ष डॉ. जालिंदर पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

स्वागत अशोक फराकटे यांनी केले, प्रास्ताविक दत्तात्रय उगले यांनी सादर केले, तर आभार प्रदर्शन माजी सभापती बाबा नांदेकर यांनी मानले.

यावेळी भाई आनंदराव आबिटकर, ज्येष्ठ नेते के. जी. नांदेकर, गोकुळचे संचालक नंदकुमार ढेंगे, कल्याणराव निकम, अरुण जाधव आणि दौलतराव जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.