ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे वयाच्या 89 व्या वर्षी निधन

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे वयाच्या 89 व्या वर्षी निधन

मुंबई - बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील “ही-मॅन” म्हणून ओळखले जाणारे धर्मेंद्र यांचे निधन झाले आहे. न्यूज एजन्सी IANS नुसार, आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला असून त्यांच्या जाण्याने संपूर्ण चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. ते 89 वर्षांचे होते आणि गेल्या काही दिवसांपासून प्रकृती अस्वस्थ होती.

काही दिवसांपूर्वी त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांच्यावर सतत उपचार सुरू होते. तब्येतीत सुधारणा झाल्यानंतर 12 नोव्हेंबर रोजी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता, ज्यामुळे कुटुंबीयांना मोठी आशा वाटली होती. दुःखद योगायोग म्हणजे, धर्मेंद्र पुढील महिन्यात 8 डिसेंबरला आपला 90वा वाढदिवस साजरा करणार होते. कुटुंबीयांनी यासाठी विशेष तयारी केली होती, परंतु त्याआधीच ते काळाच्या पडद्याआड गेले.

धर्मेंद्र यांनी केवळ अभिनेता म्हणून नव्हे तर निर्माता म्हणूनही आपली ओळख निर्माण केली. तब्बल 65 वर्षांच्या कारकिर्दीत 300 हून अधिक चित्रपट देत त्यांनी हिंदी सिनेमात सर्वाधिक हिट चित्रपट देणाऱ्या नायकाचा मान मिळवला. त्यांच्या निधनाने हिंदी चित्रपटसृष्टीतील एक सुवर्णयुग संपुष्टात आले आहे.

धर्मेंद्र यांचा जन्म 8 डिसेंबर 1935 रोजी पंजाबमधील लुधियाना जिल्ह्यातील नसराली येथे झाला. त्यांचे खरे नाव केवल कृष्ण देओल असून ते एका सर्वसामान्य पंजाबी जाट कुटुंबात जन्मले. त्यांचे मूळ गाव लुधियानाच्या पखोवाल तहसीलमधील रायकोटजवळील डांगो आहे. धर्मेंद्र यांचे बालपण सहनेवाल येथे गेले. त्यांनी शिक्षण लुधियानातील लालटन कलान येथील सरकारी वरिष्ठ माध्यमिक विद्यालयात पूर्ण केले. त्यांचे वडील गावातील शाळेत मुख्याध्यापक होते. धर्मेंद्र यांच्या निधनाने भारतीय सिनेमाच्या इतिहासात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या अभिनयाची, व्यक्तिमत्त्वाची आणि विनम्रतेची आठवण चाहत्यांच्या मनात सदैव राहील.