मराठी शाळांप्रमाणे इंग्रजी शाळांच्या दप्तराचे ओझेही कमी करा : युवासेना ठाकरे गटाची मागणी

मराठी शाळांप्रमाणे इंग्रजी शाळांच्या दप्तराचे ओझेही कमी करा : युवासेना ठाकरे गटाची मागणी
यावर ठोस निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

कोल्हापूर / माझा महाराष्ट्र प्रतिनिधी 

मराठी शाळांप्रमाणे इंग्रजी शाळेतील विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझेही कमी करा अशी मागणी आज युवासेना ठाकरे गटाच्यावतीने करण्यात आली. 

शासकीय शाळांतील विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे जरी कमी झाले असले, तरी इंग्रजी शाळांमधील विद्यार्थ्यांच्या पाठीवर हे ओझे कायम आहे. यामुळे शाळांमधील विद्यार्थ्यांना अद्यापही दप्तराचे भलेमोठे ओझे घेऊन शाळा गाटावी लागते. या ओझ्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना पाठदुखीचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे मराठी शाळांप्रमाणे इंग्रजी शाळेतील विद्यार्थ्यांच्या पाठीवरील हे दप्तराचे ओझे कमी करावे, या मागणीचे निवेदन युवासेना ठाकरे गटाच्यावतीने शिक्षण उपनिरीक्षक रवींद्र चौगुले यांना देण्यात आले. 

निवेदनात म्हटले आहे की, राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने पाहिली ते आठवी पर्यंत एकच पुस्तक ठेवले आहे. यात सोबत कोरी पाने जोडल्याने वेगळे काही घेऊन जावे लागत नाही. परिणामी दप्तराचे ओझे कमी झाले. इंग्रजी शाळांमध्ये मात्र पूर्वी प्रमाणे वजनदार दप्तर आणावे लागत आहे. म्हणून आज कोल्हापूर युवासेनेच्या वतीने लवकरात लवकर इंग्रजी शाळांचे देखील ओझे कमी करावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

बीडमध्ये अति शैक्षणिक तणावामुळे नववीत शिकणाऱ्या मुलीचा हृदय विकाराने मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली. याला देखील कोचिंग क्लासच्या अति टेस्टसिरीज, अति ट्युशनचा तणाव हेच कारणीभूत ठरले. याचबरोबर इंग्रजी मिडीयममध्ये मुलांना आठवड्याला दोन-दोन तीन-तीन गणवेश कशाला? पालकांनी इतके  पैसे कुठून आणायचे ? जर यावर काही दिवसांत ठोस निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन करू, असा इशाराही यावेळी युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.

यावेळी  युवासेना जिल्हा प्रमुख मंजित माने, शहर युवा अधिकारी संतोष कांदेकर, उपशहर युवा अधिकारी लतीफ शेख, चैतन्य देशपांडे, प्रतीक भोसले,अक्षय घाटगे,युवतीसेना शहर युवती अधिकारी सानिका दामूगडे, उपशहर युवती अधिकारी प्रिया माने, सिद्धी दामूगडे, रुद्र चौगुले, सार्थक जगताप, प्रथमेश रांगणे, इंद्रजित पाटील आदी उपस्थित होते.